esakal | सोलापूर जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण होणार ज्या-त्या गावातच 
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण होणार ज्या-त्या गावातच 

दोन हजाराचा दंड व गुन्हाही होणार दाखल 
गावपातळीवर होम क्वारंटाइन, स्सथात्मक विलगीकरण केलेल्या व्यक्तीने मास्क न घालणे, बाहेर फिरणे, गर्दी करणे यासारख्या गोष्टी केल्यास पहिल्यांदा त्याला एक हजार रुपयांचा दंड करावा. दुसऱ्यांदा दोन हजाराचा दंड करावा. त्या लोकांना तत्काळ संस्थात्मक विलगीकरणामध्ये दाखल करावे. त्यांच्यावर समितीने गुन्हा दाखल करावा. दंडाची वसुली व गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी समितीला दिली असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या सुधारित आदेशात म्हटले आहे. या सगळ्या सूचना ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत यांना लागू राहतील. 

सोलापूर जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण होणार ज्या-त्या गावातच 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमिवर संशयितांना होम क्वारंटाईन व इन्टीट्युशनल क्वारंटाईन (संस्थात्मक विलगीकरण) करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, यापूर्वी असलेल्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. यापूर्वी शहर-जिल्ह्यातील काही प्रमुख ठिकाणे निश्‍चित करुन त्याठिकाणी संशयित व्यक्तींना ठेवले जात होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी आज काढलेल्या सुधारित आदेशानुसार संशियीतांचे होम क्वारंटाईन व संस्थात्मक विलगीकरण त्या-त्या गावातच केले जाणार आहे. त्या लोकांच्या देखभालीची जबाबदारी गावातील ग्रामस्तरीय समितीकडे दिली आहे. गावचे सरपंच त्या समितीचे अध्यक्ष असतील. 

कोरोनाच्या पहिल्या टप्यात शासनाने होम क्वारंटाईन व संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील काही ठिकाणे निश्‍चित केली होती. त्याठिकाणी संशियीत व्यक्तींना ठेवले जात होते. त्याठिकाणी असलेल्या सगळा खर्च प्रशासकीय पातळीवर केला जात होता. त्यामुळे विलगीकरणासाठी शासनाचा मोठ्या प्रमाणात पैसा यापूर्वी खर्च झाला आहे. त्यामुळे आता संशियीत रुग्णांना त्या-त्या गावातच लिगीकरण करण्याचे सुधारित आदेश दिल्याने शासनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी जेवण पुरवायचे आहे. मात्र, हे करत असताना विलगीकरणामध्ये ठेवलेल्यांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. विलगीकरण कक्षात ठेवलेले संशयित एकत्रित येणार नाही याची काळजीही ग्रामस्तरीय समितीने घ्यायची आहे. जे सशयित विलगीकरणामध्ये आहेत, त्यांनी स्वतःची भांडी, कपडे स्वतः धुवायची आहेत. त्यांच्यासाठी जेवणाचे साहित्य देताना शक्‍यतो "युज ऍण्ड थ्रो'चाच वापर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. विलगीकरणात असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरातूनच जेवण येणार असल्याचे त्याचा आर्थिक भार ग्रामस्तरीय समितीवर पडणार नाही. 

गावात परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींची माहिती एकत्रित करुन गटविकास अधिकारी यांच्यामार्फत तहसीलदारांना सादर करावी. बाहेरुन गावात आलेल्या व्यक्तीची खासगी व शासकीय डॉक्‍टरांकडून तपासणी करुन घ्यावी. तपासणीनंतर कोरोनासदृष्य लक्षणे न आढळल्यास संबंधितांना होम क्वारंटाइन करावे. तपासणीनंतर कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास संबंधितांना प्राथमिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी सुपुर्द करावे. होम क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या व्यक्तीला त्याच्याच घरामध्ये ठेवावे. त्याच्या घरातील इतर सदस्यांना दुसऱ्या घरामध्ये राहण्यास सांगावे. दुसरे घर नसेल तर शेजारच्या घरात राहण्यासाठी परवानगी द्यावी. या गोष्टी शक्‍य न झाल्यास त्या व्यक्तीला गावपातळीवर संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात यावे. होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीने 55 वर्षावरील व्यक्ती, मधुमेह, टीबी, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती व लहान मुलांना भेटू नये. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीला समितीने घरपोच भाजीपाला, किराणा, औषधे उपलब्ध करुन द्यावीत. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीने, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्‍यक आहे. 
संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तींना स्वतंत्र जेवण, राहणे, शौचालय इत्यादी सुविधा समितीने उपलब्ध करुन द्यायच्या आहेत. याठिकाणी असलेल्या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत गावातील लोकांमध्ये मिसळणार नाहीत. संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवलेल्या ठिकाणच्या कचऱ्याची जबाबदारी ग्रामस्तरीय समितीवर राहील.