अबब...एवढा व्याजदर! वीस हजारांसाठी घेतले 12 लाखांचे व्याज अन्‌ पुन्हा... 

तात्या लांडगे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

वीस हजारांसाठी दरमहा पाच हजारांचे व्याज 
सचिन गुणवंत जाधव याने सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यास 20 हजार रुपये व्याजाने दिले. त्याबदल्यात त्याने कर्जदाराचे बॅंक पासबूक व एटीएम कार्ड स्वत:जवळ ठेवले. महिन्याची पेन्शन जमा होताच, तो सावकार त्यांना बॅंकेत घेऊन जात होता. त्यातून दरमहा सरासरी पाच ते सहा हजार रुपये काढून घेत होता. हा प्रकार मागील 20 वर्षांपासून सुरु असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्या सावकाराने आणखी 30 हून अधिक व्यक्‍तींना व्याजाने पैसे दिल्याचे तपासांत समोर आले आहे. याबाबत सखोल तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन बंडगर हे करीत आहेत.

सोलापूर : शहरात अवैध खासगी सावकारकी उदंड झाली असून लॉकडाउनमुळे ज्यादा व्याजदराने आता कर्जदार परेशान झाले आहेत. शहरातील लिमयेवाडी येथील एका खासगी सावकाराने 2000 मध्ये रामवाडीतील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला 20 हजार रुपये व्याजाने दिले. त्याबदल्यात 20 वर्षांपासून त्या ज्येष्ठ नागरिकाला मिळणारी 14 हजारांची पेन्शन हडप करीत 12 लाखांची वसुली केली. तरीही आता आणखी साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील म्हणून सावकार दमदाटी करीत होता. अखेर त्याला कंटाळून त्यांनी पोलिस ठाणे गाठले आणि सावकाराविरुध्द तक्रार दिली.

कौटुंबिक अडचण सोडविण्यासाठी रेल्वेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर हंबीरराव किसन जाधव (वय 80) यांनी 20 वर्षांपूर्वी सचिन गुणवंत जाधव या खासगी सावकाराकडून व्याजाने 20 हजार रुपये घेतले. दरम्यान, सेवानिवृत्त हंबीरराव जाधव यांना दरमहा 14 हजार रुपयांची पेन्शन मिळते. 20 वर्षांत खासगी सावकाराने त्या कर्जदाराच्या पेन्शनमधून नुसत्या व्याजाचीच वसुली केली. मात्र, खासगी सावकाराने त्यांच्याकडून मुद्दल न घेता नुसत्या व्याजाचीच रक्‍कम पेन्शनमधून वसूल केली. 20 वर्षानंतरही आणि कर्जदाराचे वय 80 होऊनही तो सावकार आणखी साडेतीन लाख रुपयांची मागणी करत होता. याला वैतागून हंबीरराव जाधव हे खंबीर झाले आणि त्यांनी सलगर वस्ती पोलिसांत तक्रार दिली. आता त्याबाबत गुन्हे शाखेकडून तपास केला जात आहे. दरम्यान, अवैध खासगी सावकारकीविरुध्द तथा परवानाधारक सावकारांकडून ज्यादा व्याजदराची मागणी होत असल्यास खंबीरपणे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे व शहर उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांनी केले आहे. 

वीस हजारांसाठी दरमहा पाच हजारांचे व्याज 
सचिन गुणवंत जाधव याने सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यास 20 हजार रुपये व्याजाने दिले. त्याबदल्यात त्याने कर्जदाराचे बॅंक पासबूक व एटीएम कार्ड स्वत:जवळ ठेवले. महिन्याची पेन्शन जमा होताच, तो सावकार त्यांना बॅंकेत घेऊन जात होता. त्यातून दरमहा सरासरी पाच ते सहा हजार रुपये काढून घेत होता. हा प्रकार मागील 20 वर्षांपासून सुरु असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्या सावकाराने आणखी 30 हून अधिक व्यक्‍तींना व्याजाने पैसे दिल्याचे तपासांत समोर आले आहे. याबाबत सखोल तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन बंडगर हे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interest of 12 lakhs taken for twenty thousand