राजकीय साठमारीनंतर पंढरपूरच्या कोविड हॉस्पिटलचा विषय नगरपालिकेच्या सभेत 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 31 मे 2020

सर्वानुमते निर्णय होण्याची शक्‍यता 
याच विषयासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आणि येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्यासाठी नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. उद्याच्या या सभेत कोणताही वाद न होता सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा नगरपालिका वर्तुळात सुरू आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर येथे नदी पैलतीरावर नगरपालिकेच्या मालकीच्या 65 एकर जागेवरील भक्ती सागर इमारतीत कोविड-19 हॉस्पिटल उभारण्यासंदर्भात निर्णय घेणे आणि त्याच्या खर्चास मंजुरी देण्यासाठी उद्या सोमवारी (ता. 1) सकाळी 11 वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष साधना भोसले यांनी दिली. 
कोरोना पार्श्‍वभूमीवर पंढरपूर शहरात सध्या कोविड-19 हॉस्पिटल कुठे उभे करावयाचे याविषयी वाद सुरू आहे. शासनाने सुरवातीस पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 हॉस्पिटल उभे करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, उपजिल्हा रुग्णालयात विविध आजार असलेल्या रुग्णांवर दररोज उपचार केले जातात. उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 हॉस्पिटल उभे केल्यास तेथील नेहमीच्या रुग्णांची गैरसोय होईल. या भूमिकेतून आमदार भारत भालके यांनी तेथे कोविड-19 हॉस्पिटल उभे करण्यास विरोध केला होता. त्यानंतर शासनाने शहरातील खासगी रुग्णालयात कोविड-19 हॉस्पिटलची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरवात केली होती. परंतु, खासगी रुग्णालये दाट लोकवस्ती परिसरात आहेत. त्यामुळे तेथे असे हॉस्पिटल उभे करण्यात येऊ नये, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते दीपक वाडदेकर यांनी घेतली होती. त्यानंतर आमदार भारत भालके यांनी उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 हॉस्पिटल सुरू करावे आणि तेथील ओपीडी नगरपालिकेच्या दवाखान्यात सुरू करावी. ओपीडीत येणाऱ्या रुग्णांना अधिक उपचाराची गरज असल्यास शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करावे आणि तिथे महात्मा फुले योजनेअंतर्गत त्या रुग्णांवर उपचार करावेत असा निर्णय घेण्यात आला होता. 
दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय परिसरात अनेक झोपडपट्ट्या आहेत. नागरी वस्ती असल्याने तेथे कोविड-19 हॉस्पिटल करू नये, अशी भूमिका माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट, नगरसेवक अक्षय गंगेकर आणि तेथील नागरिकांनी घेतली आहे. श्री. शिरसट आणि श्री. गंगेकर यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांना यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे. आमदार प्रशांत परिचारक यांनी यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन विचारविनिमय केला होता. तेथे असलेल्या दाट लोकवस्तीचा विचार करून आमदार श्री. परिचारक यांनी उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 हॉस्पिटल उभे करू नये, अशी भूमिका घेतली आहे. 
आमदार श्री. परिचारक यांनी कोविड-19 हॉस्पिटल नदी पैलतीरावर 65 एकर जागेतील इमारतीत सुरू करण्याचा पर्याय सुचवला आहे. माढा आणि सोलापूर मतदारसंघाच्या खासदारांच्या खासदार निधीतून प्रत्येकी 10 लाख, आमदार प्रशांत परिचारक यांच्या आमदार निधीतून 10 लाख आणि पंढरपूर नगरपालिकेकडून 20 लाख रुपयांचा निधी उभा केला जाऊ शकतो. उर्वरित 50 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी पालकमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The issue of covid Hospital in Pandharpur was raised in the municipal meeting after political infighting