शेतकऱ्यांपुढे निमार्ण झाला पिकांच्या चोरीचा प्रश्न; डाळिंब चोरास शेतकऱ्यांनी पकडले 

उमेश महाजन 
Monday, 5 October 2020

शेतकऱ्यांचे साहित्य असुरक्षित 
कोरोना महामारी व निसर्गाचा लहरीपणा यामुळे सातत्याने अडचणीत सापडणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आपले उभे पीक चोरी होण्याचे नवीन संकट उभारले आहे. शेतातील उभ्या पिकांची चोरी, विद्युत पंप, वायर, यांत्रिक अवजारे यासह शेतामधील जनावरांची चोरी यामुळे परिसरातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. विठ्ठलवाडी परिसरातील तसेच गावाच्या अनेक भागातून अशाप्रकारे शेतीमालाच्या व साहित्याच्या चोऱ्या झालेल्या आहेत. परंतु पोलिसांना अद्यापही आरोपीच सापडून येत नव्हते. आता अनेक घटनांचा शोध लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

महूद (सोलापूर) : कोरोना, लॉकडाउन, वारंवार पडणारा पाऊस, शेतमालाची नासाडी आणि पडलेले दर यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांपुढे उभ्या पिकांची चोरी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगोला तालुक्‍यातील महूद येथे डाळिंब चोरी करणाऱ्या चोराला शेतकऱ्यांनी स्वतः पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 
महूद येथील स्वप्नील दशरथ मेटकरी यांनी सांगोला पोलिसात रविवार (ता. 4) रोजी मध्यरात्री तक्रार दिली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, त्यांची व त्यांच्या कुटुंबाची उपजीविका शेतीवर चालते. मेटकरीवस्ती येथे असलेल्या पाच एकर क्षेत्रात त्यांची डाळिंबाची बाग आहे. ही बाग सहा महिन्यापूर्वी धरलेली असून त्यावरील फळ काढणीस आले आहे. बाग पाहण्यासाठी व्यापारी येऊन जात आहेत. मात्र झाडावरील डाळिंब कमी होत असल्याचा प्रकार लक्षात आला. त्यामुळे रात्रीच्या वेळी अधून-मधून बागेत चक्कर मारत होतो. रविवार (ता. 4) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बागेत गेलो होतो. तेव्हा शेता शेजारील विठ्ठलवाडीत राहणारा रणजीत नानासाहेब कांबळे याने बागेतील डाळिंब तोडून पोत्यात भरल्याचे दिसून आले. सुमारे सहा हजार रुपये किमतीची शंभर किलो वजनाची भगवा जातीची डाळिंबे चोरून नेताना त्यास रंगेहात पकडले आहे. यावेळी पोलिस पाटील प्रभाकर कांबळे व फिर्यादी स्वप्नील दशरथ मेटकरी यांनी स्वतः रणजीत नानासाहे कांबळे यास सांगोला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 
कोरोना महामारी व निसर्गाचा लहरीपणा यामुळे सातत्याने अडचणीत सापडणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आपले उभे पीक चोरी होण्याचे नवीन संकट उभारले आहे. शेतातील उभ्या पिकांची चोरी, विद्युत पंप, वायर, यांत्रिक अवजारे यासह शेतामधील जनावरांची चोरी यामुळे परिसरातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. विठ्ठलवाडी परिसरातील तसेच गावाच्या अनेक भागातून अशाप्रकारे शेतीमालाच्या व साहित्याच्या चोऱ्या झालेल्या आहेत. परंतु पोलिसांना अद्यापही आरोपीच सापडून येत नव्हते. आता अनेक घटनांचा शोध लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The issue of crop theft was raised before the farmers