रामदास कोकरे यांचे नाव माथेरान येथील रस्त्याला देण्याची मागणी

अण्णा काळे 
Sunday, 24 January 2021

माथेरान गिरिस्थान नगर परिषदेमध्ये कोकरे यांनी २३ जुलै २०१८ ते १३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत कार्यरत होते.

करमाळा (सोलापूर) : रिटेवाडी (ता.करमाळा) या गावातील रामदास कोकरे यांचे नाव माथेरान ता.कर्जत, जि.रायगड या नगरपरिषदेच्या हद्दीतील सेंट व्हीला नाका ते जुना डम्पिंग ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्याला नाव द्यावे, अशी मागणी माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेचे नगरसेवक संदिप कदम यांनी केली आहे. 

माथेरान गिरिस्थान नगर परिषदेमध्ये कोकरे यांनी २३ जुलै २०१८ ते १३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत कार्यरत होते. रामदास कोकरे यांनी माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून काम करताना चांगल्या प्रकारे काम करत ओला-सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिक मुक्त माथेरान, डम्पिंग मुक्त माथेरान इत्यादी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. कोकरे यांनी माथेरान नगरपरिषद रुजू होण्याआधी तेथील कचरा संकलन व त्यावरील प्रक्रिया योग्य प्रकारे होत नव्हती. परंतु कोकरे यांच्या माथेरान नगरपरिषदकडे लक्ष केंद्रित केल्यानंतर सुट्टीच्या दिवशी ही हजेरी लावत डम्पिंग मुक्त माथेरान ही संकल्पना प्रत्यक्षात साकार केली.
 
रामदास कोकरे हे सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत उप आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. सद्यस्थितीत माथेरान गिरिस्थान नगरपरिषद हद्दीतील सुमारे तीन मेट्रिक टन कचरा निर्मिती होते. त्यापैकी दोन मेट्रीक टन ओला कचरा व एक टन सुका कचरा आहे. संपूर्ण ओला कचरा माथेरान निसर्गऋण बायोगॅस प्रकल्पात १०० टक्के प्रक्रिया केला जातो. कोकरे यांनी डम्पिंगला जाणारा कचरा बंद केला व पूर्वीचा संपूर्ण २००२ पासून डम्पिंग ग्राउंड येथे असलेल्या कचरा बायोमायनी प्रक्रियेनिर्गत केला. अशाप्रकारे कोकरे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यामुळे प्रोत्साहनात्मक बाब म्हणून सेट व्हिला ते जुन्या डम्पिंग ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्याला त्यांचे नाव द्यावे, अशी विनंती माथेरान गिरिस्थानच्या नगराध्यक्षा यांच्याकडे कदम यांनी निवेदनातून करण्यात आली आहे.

घनकचरा व्यवस्थापनात रामदास कोकरे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कोकरे यांच्या संकल्पनेतून शून्यकचरा व डंपिंग ग्राउंडमुक्त वेंगुर्ले, कर्जत व माथेरान या तिन्ही शहरांचा कायापालट झालेला असून सद्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका डंपिंग ग्रांउड मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. विविध नगरपरिषदांना जवळपास 30 कोटी रु.ची बक्षिसे त्यांनी मिळवून दिली व कच-यापासून लाखो रुपये किंमतीची उत्पन्नाची साधने निर्माण केली. सिंधुदुर्ग भूषण, उत्कृष्ट मुख्याधिकारी, स्वच्छ नगरपरिषद, थ्री स्टार नगरपरिषद, वसुंधरा मित्र, वसुंधरा सन्मान, समाज भूषण अशा 20 हून अधिक पुरस्कार त्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत. चार वेळा वसुंधरा पुरस्कार, उत्कृष्ट मुख्याधिकारी, सर्वोत्कृष्ट नगरपरिषद, फाईव्ह लिव्हस अवार्ड, दै.सकाळ सोलापूर आदी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

कोकरे यांची कारकीर्द
 
कोकरे हे २००६ ते २०१० पर्यत पोलिस उपनिरिक्षकपदी रुजू झाले. त्यावेळी वादमुक्त गाव केल्यामुळे महात्मा गांधी जागरुक पुरस्कार दिला गेला. त्यानंतर त्यांनी २०१० ते २०१२ पर्यत दापोली नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करताना प्लास्टिक मुक्त दापोली, बायोगॅसपासून वीज निर्मीती, सोलर-वायू  वीज निर्मीती, हरित शहर व कचरामुक्त शहर प्रकल्प राबवले. त्यावेळी त्यांना कोकण विभाग संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व वसुंदरा २०१२ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. २०१२ ते २०१५ या कालावधीत औसा व केज येथे मुख्याधिकारी म्हणून प्लास्टिक मुक्त व भटक्या जनावरांवर नियंत्रण मिळवले तर २०१५ ते २०१७ मध्ये मुख्याधिकारी म्हणून वेंगुर्ला येथे टाकाऊपासून तेल व प्लास्टिकपासून रस्ता प्रकल्प राबवत प्लास्टिक मुक्त शहर तयार केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is being demanded that the road at Matheran be named after Ramdas Kokare at Karmala