
उजनीतील पाणी प्रदूषणामुळे लाभक्षेत्रातील जमिनी येत्या 25 वर्षांत क्षारपड होऊन त्यांची उत्पादन क्षमता घटणार आहे. त्यासाठी नागरिकांनी शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होण्याच्या दृष्टीने सेंद्रिय पदार्थांकडे वळावे, असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.
मंगळवेढा (सोलापूर) : उजनीतील पाणी प्रदूषणामुळे लाभक्षेत्रातील जमिनी येत्या 25 वर्षांत क्षारपड होऊन त्यांची उत्पादन क्षमता घटणार आहे. त्यासाठी नागरिकांनी शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होण्याच्या दृष्टीने सेंद्रिय पदार्थांकडे वळावे, असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील मारापूर येथे यादव बाग सेंद्रिय गूळ निर्मिती उद्योगाच्या तिसऱ्या हंगामाच्या प्रारंभप्रसंगी आमदार परिचारक बोलत होते. या वेळी व्यासपीठावर दामाजीचे संचालक भुजंग आसबे, बाळासाहेब यादव, ऍड. धनंजय हजारे, शहाजी यादव, अनिल वगरे, राजकुमार यादव, हरिभाऊ यादव, अंकुश पडवळे, पिंटू माने, शिवाजी शिंदे, मोहन यादव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार परिचारक पुढे म्हणाले, की माणसाला रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विविध जीवनसत्त्वांची गरज असते. शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी विविध खतांची गरज असते. सिक्कीम राज्यामध्ये शंभर टक्के सेंद्रिय खताचा वापर शेतीत केल्यामुळे त्या राज्यातील नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. उत्पादन कमी आणि खर्च जास्त यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्याच्या मोहापायी माणूस सध्या कुठल्याही थराला जाऊ लागला आहे. निसर्गाने जे निर्माण केले आहे त्याचा विनाश करण्याकडे आपण चाललोय. आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नागरिकांनी शेतीत सेंद्रिय खताबरोबरच आहारात सेंद्रिय घटकांचा वापर वाढवणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, पंढरपूरमधील शंभर गावातील पिण्याच्या पाण्याच्या चाचणीत आढळलेले दूषित पाणी सध्या पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे नागरिक विविध आजारांना बळी पडत आहेत. परंतु सुदैवाने भारतीय नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता जगाच्या तुलनेत जास्त असल्यामुळे कोरोनाचा प्रभाव वाढू शकणार नाही. परंतु कोरोनाने माणसाला कसं जगायचं, हे शिकवले. त्यामध्ये बचतीचा मार्ग शिकवला, खर्चावर मर्यादा राहिल्या, एरव्ही शासनाला हात धुवा म्हणून सांगावे लागत होते परंतु आता नागरिक स्वतःहून हात धुऊ लागले आहेत.
प्रास्ताविकामध्ये बाळासाहेब यादव म्हणाले, तिसऱ्या सेंद्रिय गूळ निर्मिती हंगामामध्ये वाटचाल करताना यंदा शंभर टन सेंद्रिय गूळ निर्मिती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असून, त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे त्यांना सेंद्रिय गूळ उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल