जर्सी गाईच्या किमतीने ओलांडला लाखाचा टप्पा ! जाणून घ्या का वाढताहेत किमती

Jersey cow
Jersey cow
Updated on

मोहोळ (सोलापूर) : ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय जोरात चालतो. या व्यवसायासाठी लागणाऱ्या जर्सी गाईच्या किमतीने एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला असून, दुधाचे दर वाढल्याने गाईच्या किमतीही वाढल्या आहेत. मात्र दूध दराच्या हिशेबाने व दररोज लागणाऱ्या पेंड, पशुखाद्य, मका भरडा, हिरवा चारा व कडबा यांचा हिशेब केला तर दुग्ध व्यवसाय फारसा नफ्यात नसल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. 

मोहोळ तालुक्‍यातील काही भागात कमी पाण्यावर लवकर येणारा भाजीपाला, फळभाज्या, फळे लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र लॉकडाउनमुळे कुठल्याही शेती मालाबरोबरच पालेभाज्यांनाही दर नाहीत. त्यामुळे शेतकरी सर्रास दुग्ध व्यवसाय करीत असतो. गेल्या पंधरा दिवसांपासून दुधाचे दर वाढल्याने दुभत्या गाई खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. दिवसाला 20 लिटर दूध देणाऱ्या गाईची किंमत साधारण 65 ते 70 हजार रुपये आहे, तर दिवसाला 25 ते 30 लिटर दूध देणाऱ्या गाईची किंमत सुमारे एक लाख व त्यापुढे आहे. 

एका शेतकऱ्याकडे किमान पाच ते सहा गाई असतातच. त्यामुळे प्रापंचिक खर्चासह शेतीच्या मजुरांचा व इतर खर्च भागवला जातो. त्यात गाईच्या टक्केवारीवरही किंमत अवलंबून असते. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुळे जनावरांचे बाजार बंद आहेत, मात्र आपसातील व्यवहार सुरू आहेत. सध्या दूध साधारण तीस रुपये प्रतिलिटर आहे. त्या मानाने पशुखाद्याचे व इतर चाऱ्यांचे दर ज्यादा असल्याने दुग्ध व्यावसायिकांना फारसे परवडत नाही. केवळ घर प्रपंच भागतो व लोकांच्या देण्या- घेण्याचा व्यवहार फिरतो. त्यामुळे दुग्ध व्यवसाय परवडतो. त्यात जमेची बाजू म्हणजे, शेतीला लागणारे मोठ्या प्रमाणात शेणखत मिळते. रासायनिक खताच्या किमती वाढल्याने जमिनीत शेणखत घालण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहतो. 

असे आहेत पशुखाद्य व चाऱ्याचे दर... 

  • पशुखाद्य पोते : 1100 रुपये (70) किलो 
  • खापरी पेंड : 1900 रुपये (50) किलो 
  • मका भरडा : 1000 रुपये (50) किलो 
  • मकेचा हिरवा चारा : 1200 रुपये गुंठा 
  • कडवळ : 1100 रुपये गुंठा 
  • कडबा : 20 ते 25 रुपये पेंढी 

माझी दिवसाला तीस लिटर दूध देणारी जर्सी गाय गेल्या शुक्रवारी एक लाख अकरा हजार रुपयांना पेनूर येथील शेतकऱ्याला विकली आहे. दुधाचे दर वाढल्याने दुभत्या जनावरांच्या किमती वाढल्या आहेत. 
- अमोल पाटील, 
उपसरपंच, पापरी, ता. मोहोळ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com