नवीन पालकमंत्री ऍक्‍शन मूडमध्ये (Video)

अशोक मुरुमकर 
गुरुवार, 2 एप्रिल 2020

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आव्हाड हे तिसऱ्याच दिवशी सोलापुरात आले आहेत. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या जिल्हा बंदीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. सोलापूरच्या पाणी प्रश्‍नाला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शुक्रवारी (ता. 3) ते सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेणार आहेत.

सोलापूर : जगातली ही पहिली लढाई अशी आहे, आपण एकत्र येऊन घरात बसा, लढाई आम्ही जिंकू... असे विधान करत, कदाचित काळाने आपल्याला यासाठी घरी बसवलाय की, एकमेकांवरील प्रेम दाखवण्यासाठी, दुरावलेला संवाद आणि परत संवादाच्या माध्यमातून प्रेम व भावना व्यक्त करण्यासाठी लॉकडाऊन दरम्यानच्या वेळेचा उपयोग करा, असे आवाहन पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आव्हाड हे तिसऱ्याच दिवशी सोलापुरात आले आहेत. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या जिल्हा बंदीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. सोलापूरच्या पाणी प्रश्‍नाला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शुक्रवारी (ता. 3) ते सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेणार आहेत. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या थैमानामुळे जग धास्तावला आहे. त्यामुळे देश लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रातही त्याचे रुग्ण वाढत आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नसला तरी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. 
दिलीप वळसे-पाटील यांच्या जागेवर दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर ते गुरुवारी (ता. 2) सोलापुरात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्‍त दीपक तावरे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, निवासी जिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्याकडून त्यांनी जिल्ह्यातील माहिती घेतली. कोरोना व्हायरसला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी घरात बसण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शरद पवार यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी येथे आल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. त्याबाबत चर्चा होणार आहे. आपण एकत्र येऊन ही लढाई लढत आहोत. गुण्यागोविंदाने घरात बसून आपण ही लढाई जिंकूयात, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Awhad in Solapur on the third day