भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही..! ग्रामपंचायत लढवण्याची "या' आजीची इच्छा झाली 85व्या वर्षी पूर्ण

भारत नागणे 
Tuesday, 19 January 2021

वय अवघे 85 वर्षे, पण उत्साह तरुणांना लाजवेल असाच. इच्छाशक्तीच्या जोरावर कलावती शिंदे या वृद्ध पण मनाने तरुण असलेल्या आजीने ग्रामपंचायत निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. शिवाय राज्यात सर्वाधिक वयोवृद्ध महिला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्याचा मानही मिळवला आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही... ही म्हणून प्रत्यक्ष एका 85 वर्षांच्या कलावती शिंदे या आजीच्या बाबतीत घडली आहे. गेले अनेक वर्षे ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्याची इच्छा असणाऱ्या कलावती आजींनी अखेर पंढरपूर तालुक्‍यातील देवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. वय अवघे 85 वर्षे, पण उत्साह तरुणांना लाजवेल असाच. इच्छाशक्तीच्या जोरावर कलावती शिंदे या वृद्ध पण मनाने तरुण असलेल्या आजीने ग्रामपंचायत निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. शिवाय राज्यात सर्वाधिक वयोवृद्ध महिला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्याचा मानही मिळवला आहे. 

देवडे (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठी चुरस होती. या चुरशीच्या निवडणुकीमध्ये येथील 85 वर्षांच्या कलावती शिंदे या निवडून आल्या आहेत. भाजप आमदार प्रशांत परिचारक गटाकडून त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. 

ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की, भावकी आणि नात्यागोत्याचं राजकारण आलंच. पण गावच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या 85 वर्षांच्या कलावती आजीने या सगळ्या गोष्टींवर मात करत स्वतःच्या हिंमतीवर विजय खेचून आणला आहे. भीमा नदीकाठी असलेल्या देवडे गावात आजही अनेक समस्या आहेत. गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कलावती शिंदे या निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. अशा वयातही त्यांनी गावातील वाड्या - वस्त्यांवर व गावातील घरोघरी फिरून प्रचार केला आणि चक्क विजयही मिळवून दाखवला. "गाव करेल ते राव काय करेल' अशी म्हणही कलावती या आजीने प्रत्यक्षात खरी करून दाखवली आहे. 

विजयी झाल्यानंतर कलावती आजी म्हणाल्या, की ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्याची माझी खूप इच्छा असायची; पण कोणत्या ना कोणत्या कारणांनी माझी उमेदवारी कापली जायची. प्रत्येक वेळी खूप वाईट वाटायचं. एक दिवस ग्रामपंचायत निवडणूक लढवीन आणि जिंकून देखील येईन, असं मी स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न आज पूर्ण झालं आहे. आता माझी जबाबदारी वाढली आहे. 

गावात रस्त्यांची अडचण आहे. लहान मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या समस्या मला सोडवायच्या आहेत. त्यांना शाळेला जायला- यायला रस्ताही चांगला नाही. पावसाळ्यात तर चिखलाने खूप त्रास होतो. गावात विजेचा प्रश्न आहे. ही सगळी कामं मी करणार आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे तो मी सार्थ करून दाखवणार असल्याचंही आजीबाईनं सांगितलं 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalawati Shinde from Pandharpur became the oldest woman Gram Panchayat member in the state