पर्यटनाला मोठी संधी ! कंबर तलावातील जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरवात

तात्या लांडगे 
Thursday, 24 September 2020

विजयपूर रोडवरील श्री धर्मवीर संभाजीराजे तलावातील (कंबर) जलपर्णी व गाळ काढला जाणार आहे. बुधवारी (ता. 23) जलपर्णी काढण्याचे प्रात्यक्षिक करून मशिनचा बॅलन्स आहे का, काम करताना अडचणी येतील का, याची चाचपणी झाली. आता आजपासून (गुरुवारी) कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे.

सोलापूर : विजयपूर रोडवरील श्री धर्मवीर संभाजीराजे तलावातील (कंबर) जलपर्णी व गाळ काढला जाणार आहे. बुधवारी (ता. 23) जलपर्णी काढण्याचे प्रात्यक्षिक करून मशिनचा बॅलन्स आहे का, काम करताना अडचणी येतील का, याची चाचपणी झाली. आता आजपासून (गुरुवारी) कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. 

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेत श्री धर्मवीर संभाजीराजे तलावाचा समावेश झाला. तत्पूर्वी, "सकाळ'च्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी तलावासाठी निधी मिळवून देण्यात मोठे योगदान दिले. केंद्र सरकारकडून तलावाच्या सुशोभिकरणासाठी सात कोटी 32 लाखांचा निधी मिळाला आहे. त्यानंतर महापालिकेनेही चार कोटी 88 लाखांचा हिस्सा दिला आहे. निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर तमिळनाडूतील सेफ-वे कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जलपर्णी काढण्याचे काम महिनाभर चालणार आहे. यादरम्यान तलावातील गाळाचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यानंतर गाळ काढण्यासाठी ड्रेजिंग मशिन सोलापुरात दाखल होईल. आठ महिने गाळ काढण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. 

पर्यटनातून वाढेल उत्पन्न 
स्मार्ट सिटी योजनेतून सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर तलाव परिसर आणि तलावाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. तत्पूर्वी, केंद्र सरकारच्या सरोवर विकास योजनेतून श्री धर्मवीर संभाजीराजे तलावाचे सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर पर्यटनात वाढ होणार आहे. महापालिकेला दरमहा मोठे उत्पन्नवाढीसाठी त्यातून मोठी संधी मिळणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kambar Lake beautification work has started