"कांचन' की "गटार' गंगा सोसायटी ?  महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष; रहिवाशी व्यक्त करताहेत संताप 

श्‍याम जोशी 
Wednesday, 28 October 2020

गेल्या 25 वर्षापासून येथील वसाहतीत सुमारे 100 कटूंबं राहतात. वेळच्या वेळी महापालिकेला कर भरणा करूनही या भागात सुविधा नसल्याने नागरिकांचा संताप होत आहे. आपला प्रभाग कोणता अन्‌ नगरसेवक कोण याचाही अनेकांना पत्ता नाही. नगरसेवकच या भागात फिरकत नसल्याचे रहिवाशी सांगतात.

दक्षिण सोलापूर ः सोलापूर शहराच्या हद्दवाढीनंतर महापालिकेत समावेश झालेल्या सैफुल परिसरातील कांचनगंगा सोसायटीत अद्यापही रस्ते, पथदिवे अन्‌ ड्रेनेजलाईन नसल्याने रहिवाशांतून महापालिकेच्या विरोधात संताप आहे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने जागोजागी पाण्याचे डबके व तळे साचल्याने हि "कांचन' की "गटार' गंगा सोसायटी असाच प्रश्‍न पडत आहे. 

गेल्या 25 वर्षापासून येथील वसाहतीत सुमारे 100 कटूंबं राहतात. वेळच्या वेळी महापालिकेला कर भरणा करूनही या भागात सुविधा नसल्याने नागरिकांचा संताप होत आहे. आपला प्रभाग कोणता अन्‌ नगरसेवक कोण याचाही अनेकांना पत्ता नाही. नगरसेवकच या भागात फिरकत नसल्याचे रहिवाशी सांगतात. महापालिकेकडून कमी दाबाने जरी असला तरी केवळ नळ पाणीपुरवठा सुरू आहे. ही एकमेव सुविधा या परिसरातील लोकांना महापालिकेकडून मिळते. त्यातच धन्यता मानून गप्प बसावे लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. शहाराचा विस्तार विजापूर रोड परिसरात अधिक झाल्याने येथे अनेक वसाहती आहेत. त्या वसाहतीतही महापालिकेकडून सुविधा देणेचे काम संथ गतीनेच होत आहे. 20-25 वर्षापासून महापालिका प्रथामिक सुविधाही देऊ शकलेली नाही. गेल्या 20 वर्षात या परिसरात महापालिकेच्या अरोग्य, शिक्षण, स्वच्छता, बांधकाम, परिवहन या विभागाचे कोणतेच ठोस काम नसल्याचे दिसून येते. ना दिवाबत्ती, ना रस्ता, ना दवाखाना, ना शाळा, ना 

या परिसरातील रहिवासी प्रतिभा लोंढे या सांगतात की, येथे 2002 पासून राहत आहे. रस्ते नसल्याने पावसाळ्यात चिखल होतो. सांडपाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष द्यावे. 

अनिल मराळ यांनी सांगितले की, सैफुल परिसरातील सर्वात जुनी सोसायटी असूनही अद्याप विकास नाही. महापालिकेने रस्ते तयार करून दिवाबत्तीची सोय करणे गरजेचे आहे. या परिसरात चोऱ्यांचे प्रमाणही वाढल्याने पोलीस गस्त वाढवण्याची गरज आहे. 

नंदा दोंतूलवार यांनी सांगितले की, 25 वर्षापासून येथे राहत आहे. पावसाळ्यात चिखल होतो. डासांचे प्रमाण वाढल्याने अनारोग्य पसरले आहे. वेळच्या वेळी फवारणी होत नाही. स्वच्छता कर्मचारी कधीच फिरकत नाहीत. 

तुळजाबाई पाटील यांनी सांगितले की, सोसायटीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना धावाधाव करावी लागते. रस्त्याचे व पथदिव्याचे काम होणे आवश्‍यक आहे. अरोग्य सुवधा उपलब्ध व्हावी. 

कविता मराळ यांनी सांगितले की, डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरात रोगराई होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेने आठवड्यातून किमान एकदा तरी जंतूनाशक औषधाची फवारणी करावी. महापालिकेची शाळी व दवाखाना या परिसरात होण्याची गरज आहे. 

अविनाश उत्तरकर यांनी सांगितले की, या सोसायटीत 2012 पासून राहतो. येथे पाच दिवसानंतर अन्‌ कमी दाबाने नळाला पाणी येते. रस्त्याची मागणी करूनही अद्याप रस्ता तयार झालेला नाही. त्यामुळे केवळ कर वसुल करणारी महापालिका सुविधा मात्र देत नाही. 

स्नेहा येवतकर यांनी सांगितले की, प्रत्येक पावसाळ्यात आमच्या घरात पाणी येते. सुमारे तीन ते चार फुट पाणी साचत असल्याने पंचाईत होते. त्यातून आमच्या घराला रस्ताच नाही. पथदिव्यासाठी एके ठिकाणी पोलचे फाऊंडेशन करून ठेवलेय गेल्या कित्येक दिवसापासून लाईटचा खांब बसवण्याची आम्ही वाट पाहतोय. 

शिवानंद सोनकंटले यांनी सांगितले की, सोसायटीत सांडपाण्याची पाईपलाईन व ड्रेनेजलाईन न झाल्याने अनेक घरातील गटाराचे पाणी घरासमोरच सोडले जाते. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी व डासांचा फैलाव झाला आहे. त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर दखल घेऊन रस्ता, ड्रेनेज व पथदिव्यांची सायो करावी. 

इम्रान पिरजादे यांनी सांगितले की, नगरसवेक व अधिकारी कधीच येत नाहीत. या सोसायटीत रस्ता, ड्रेनेजची व्यवस्था होण्याची आवश्‍यकता आहे. 25 वर्षापासून महापालिकेकडे पाठपुरावा करूनही कोणतीच सुविधा दिली जात नाही. त्यामुळे कर भरणा का करायचा असा प्रश्‍न पडतो. 

गजराबाई सोनवणे यांनी सांगितले की, उतारावरून येणारे सर्व पाणी आमच्या घरात येते. सुमारे चार ते पाच फूट पाणी साचत असल्याने त्रास होत आहे. सोसायटीतील रस्ते तयार करण्याची गरज आहे. लहान मुलांसाठी क्रिडांगण, महिलांच्या अरोग्यासाठी घरोघरी अरोग्य सेविका येणे गरजेचे आहे. 

उज्ज्वला कुलकर्णी यांनी सांगितले की, घंटागाडी वेळेवर व घरपर्यंत येत नाही. त्यासाठी मुख्य रस्त्यापर्यंत कचरा घेऊन जाताना आम्हा ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. उघड्या गटारीमुळे डासांचे प्रमाण वाढले ाहे. त्यासाठी ड्रेनेज लाईन, रस्ता होणे गरजेचे आहे. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Kanchan" or "Gutter" Ganga Society? Unforgivable negligence of the corporation; Residents are expressing anger