वकिलाने केली पैलवानावर मात ! कौठाळीच्या राजकीय फडातील लढतीचीच सर्वत्र चर्चा 

भारत नागणे 
Wednesday, 20 January 2021

कुस्त्यांच्या मैदानात आणि राजकारणाच्या फडात पैलवान नेहमीच सरस ठरल्याचे आपण पाहतो. परंतु, कौठाळी ग्रामपंचायतीची निवडणूक याला अपवाद ठरली आहे. कुस्तीच्या आणि राजकारणाच्या मैदानात खुबीने डावपेच करणाऱ्या संदीप पाटलांना या निवडणुकीत व्यवसायाने वकील असलेल्या दत्तात्रय पाटील यांनी आपल्या बुद्धिबळाच्या खेळीने चितपट करून बाजी मारली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा रणसंग्राम नुकताच पार पडला. निवडणूक निकालानंतर विविध अंगाने आणि रोमहर्षक झालेल्या लढती समोर येऊ लागल्या आहेत. कौठाळी (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील अशाच एका लढतीची चर्चा तालुक्‍यात सध्या जोरात सुरू आहे. 

व्यवसायाने वकील असलेल्या दत्तात्रय पाटील यांनी आपले प्रतिस्पर्धी पैलवान असलेले संदीप पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात चितपट करत बाजी मारली आहे. दुसरीकडे, उच्चशिक्षित असलेल्या यशश्री पाटील यांनी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक मोहन नागटिळक यांच्या पत्नी लक्ष्मी नागटिळक यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकाच वेळी पाटील दाम्पत्याने निवडणुकीचा फड जिंकल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

कुस्त्यांच्या मैदानात आणि राजकारणाच्या फडात पैलवान नेहमीच सरस ठरल्याचे आपण पाहतो. परंतु, कौठाळी ग्रामपंचायतीची निवडणूक याला अपवाद ठरली आहे. कुस्तीच्या आणि राजकारणाच्या मैदानात खुबीने डावपेच करणाऱ्या संदीप पाटलांना या निवडणुकीत व्यवसायाने वकील असलेल्या दत्तात्रय पाटील यांनी आपल्या बुद्धिबळाच्या खेळीने चितपट करून बाजी मारली आहे. 

तर दुसरीकडे, दत्तात्रय पाटील यांच्या पत्नी यशश्री पाटील यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून पंचायतीवर वर्चस्व राखणाऱ्या संचालक मोहन नागटिळक यांच्या पत्नीचाही पराभव करत राजकारणाचा फड जिंकला आहे. ग्रामंचायतीच्या निवडणुकीत पाटील पती - पत्नीने विजय मिळवल्याने त्यांच्या या विजयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

गावातील सर्वसामान्य लोकांशी मोठा जनसंपर्क आहे. तर पत्नी यशश्री या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी आतापर्यंत महिलांसाठी केलेल्या कामांमुळेच त्यांचा विजय झाला आहे, असे ऍड. दत्तात्रय पाटील यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Kauthali Gram Panchayat election the lawyer won against wrestler