अतिवृष्टीत वाहून गेलेला केत्तूर नंबर दोन ते पोमलवाडी रस्ता सुरू झाला !

राजाराम माने 
Thursday, 29 October 2020

मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने उजनी जलाशयावरील पुलाचा भरावाच वाहून गेला होता. त्यामुळे करमाळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील प्रवाशांची प्रवासाची मोठी अडचण झाली होती. अखेर ठेकेदाराने हा भरावा भरून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. 

केत्तूर (सोलापूर) : मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने उजनी जलाशयावरील पुलाचा भरावाच वाहून गेला होता. त्यामुळे करमाळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील प्रवाशांची प्रवासाची मोठी अडचण झाली होती. अखेर ठेकेदाराने हा भरावा भरून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. 

2013 मध्ये सूर्यकांत पाटील, अशोक पाटील, ऍड. अजित विघ्ने यांच्या पुढाकाराने सव्वा कोटी रुपये लोकवर्गणी करून पुनर्वसित भागातील उजनी जलाशयाच्या फुगवट्यावरील केत्तूर नंबर दोन ते पोमलवाडीदरम्यान हा रस्ता भरावा भरून पूर्ण केला व त्यावरून वाहतूक सुरू झाली होती. गेल्या 45 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न लोकांनीच लोकवर्गणी काढून मार्गी लावला होता. त्यामुळे पुनर्वसित भागातील प्रवाशांना भिगवण, बारामती, पुणे, इंदापूर येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला. 

अखेर आमदारकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आमदार नारायण पाटील यांनी या भागातील या प्रलंबित वाहतुकीचा प्रश्‍न सोडवला व या 700 मीटर लांबी असलेल्या या पुलाला शासकीय मंजुरी मिळवून दिली. सध्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे हिंगणी (ता. करमाळा) येथील तलाव भरून सांडवा फुटल्याने हे पाणी वेगाने उजनी जलाशयात येत होते. या प्रवाहामुळे पुलाच्या भागाचा भरावाच वाहून गेल्याने हा मार्ग सुरू झाल्यापासून सात वर्षांत प्रथमच बंद पडला होता. 

सदर ठेकेदाराने वाहून गेलेल्या भरावाच्या ठिकाणी माती - मुरूम टाकून हा रस्ता पूर्ववत सुरू केला आहे. त्यामुळे प्रवाशांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. 

याबाबत केत्तूरचे ऍड. अजित विघ्ने म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासूनचा जनतेचा प्रश्न मार्गी लागल्याने आनंदात असतानाच प्रचंड पडलेल्या पावसामुळे पुलाजवळील दोन्ही बाजूचा भरावा वाहून गेला होता. यामध्ये टी अँड टी कंपनीचा एक कामगार देखील मृत झाला. परंतु, अशाही स्थितीत संबंधित ठेकेदाराने तेथील रस्ता भरावा भरून चालू केला आहे. त्यांचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहेत. येथील पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातून वाहतूक प्रचंड वाढणार आहे. या भागातील तरुणांना पर्यटन, हॉटेलिंग व इतर अनेक उद्योगधंदे उभारता येणार आहेत. 

पोमलवाडीचे माजी सरपंच संग्राम पाटील म्हणाले, आमच्या ग्रामस्थांनी अतिशय कष्टातून हा पूल साकारला आहे. तो पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने तुटल्यानंतर रात्रभर झोप आली नाही. केत्तूर नंबर दोन ते पोमलवाडीचा हा पूल भविष्यात उद्योग मार्ग, पर्यटन मार्ग होणार आहे. 

पोमलवाडीचे रहिवासी सूर्यकांत पाटील म्हणाले, केत्तूर नंबर दोन ते पोमलवाडीचा पूल हा पश्‍चिम भागातील महत्त्वाचा पूल (रस्ता) असून, येथून भिगवण, पुण्याकडे जाणारी प्रचंड वाहतूक आहे. येथून अगदी अर्ध्या तासात भिगवणला पोचता येते. मागील आमदारांनी या कामास भरीव सहकार्य केले होते, तसेच या भागातील विविध रस्ते व पुलांसाठी विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी देखील पाठपुरावा केला असून, डिकसळ पूल व खातगाव येथील पुलांकरिता नाबार्डकढून निधी मिळवला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kettur number two to Pomalwadi road started after heavy rains