सांगोला तालुक्‍यातील किंगमेकर सुभाष पाटील 

Subhash Patil.jpg
Subhash Patil.jpg

स्मरण : 
सुभाष राजाराम पाटील हे सर्वांमध्ये नाना म्हणूनच परिचीत होते. सुभाष नानांचा जन्म 19 डिसेंबर 1958 साली झाला. पाच भावात सर्वात लहान असूनही वडील बंधूंच्या मार्गदर्शनाखाली सुरवातीपासूनच सच्चे मात्र, बेधडक म्हणून ओळखले जात होते. 

विद्यार्थी दशेपासूनच नेतृत्वाची आवड - 

पंढरपूर कॉलेज निर्माण झाल्यापासून ग्रामीण भागातील पहिला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. ही त्यांची चुरशीची झालेली पहिलीच निवडणूक चांगलीच गाजली व त्यांनी आपली कारकीर्द यशस्वी करूनही दाखवली. पुरोगामी सरकारच्या शरद पवारांच्या सभेत विद्यार्थ्यांच्यावतीने भाषण करताना उपस्थित केलेल्या मुलींच्या वस्तीगृहाच्या प्रश्नावर याच व्यासपीठावरून शासनाकडून 10 लाख रुपयाची मदत मिळवून दिली होती. चिक-महूद सारख्या स्वतःच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये लक्ष घालून तालुक्‍यात शेकापची सत्ता असतानाही 1985-86 ला नाना सरपंच म्हणून निवडले गेले होते. फक्त स्वतः सरपंच झाले म्हणून ते थांबले नाहीत तर तालुक्‍यात शेकापची सत्ता असल्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या सरपंचाकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी कॉंग्रेसप्रणित सरपंच संघटना स्थापन केली. यासाठी त्यांनी तालुक्‍यातील अनेक शेकापविरोधी बड्या नेत्यांना एकत्रित करून कॉंग्रेसची लोकचळवळ एक प्रकारे जागृत करण्याचे काम केले होते. 
जिल्हा कॉंग्रेसमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील व सुशीलकुमार शिंदे यांच्यात गटातटाचे राजकारण अप्रत्यक्षपणे सुरू झाले होते. यावेळी सुशीलकुमार शिंदे व शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाने 1991 साली प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या जागेवर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. बिकट परिस्थिती असतानाही जिल्ह्यात गटातटाच्या राजकारणाला तडा देत तालुक्‍यामधील विविध गावात तरुणांची फळी निर्माण करण्याचे काम त्याकाळी सुभाष नानांनी केले होते. चळवळीचे नेतृत्व उभारताना त्यांनी मोठ्या घराण्यातील तरुणांकडे लक्ष न देता होतकरू व सर्वसामान्यांच्या मुलांकडे नेतृत्वाची संधी दिली होती. त्यावेळी राज्यमंत्री असणारे अजित पवार व युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष व गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांची नानांच्या चळवळीच्या राजकारणाला पाठिंबा मिळाला होता. 
शेतीची विशेष आवड - 
तालुक्‍याच्या राजकारणाबरोबरच भावांमध्ये सर्वात लहान असून सुद्धा त्यांनी स्वतःच्या शेतीकडे विशेष लक्ष दिले होते. चिकमहुद येथे त्यांनी कमी पाण्यावर येणारे डाळिंबाच्या बागेची लागवड केली होती. डाळिंब बागेशिवाय त्यांनी द्राक्ष लागवडीचाही विशेष प्रयोग केला होता. सांगोला तालुक्‍यात प्रथमच बटाटा पिकाची लागवड करून त्याचे यशस्वी उत्पादनही त्यांनी घेतले होते. तामिळनाडूतून कापसाचे बियाणे आणून वरलक्ष्मी सारखा नवीन वाण प्रथमच आपल्या शेतात लागवड करून त्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले होते. त्यापासूनच वरलक्ष्मी कपासाच्या जातीचे वाण तालुक्‍यात लागवडीस येऊ लागले होते. लहान असून सुद्धा प्रत्येक क्षेत्रातील कामांमध्ये पुढे येऊन काम करण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. त्याचबरोबर बेधडकपणे व प्रामाणिक वागण्यामुळे त्यांनी आपली स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. 
शहाजीबापुंच्या राजकीय जडणघडणीकडे लक्ष - 
सांगोला तालुक्‍यात सर्वच निवडणुकीमध्ये शेकाप पक्षाचे प्राबल्य दिसत होते. त्याकाळी शेकाप विरोधी कॉंग्रेसला बळ मिळणे फार अवघड होते. अशा काळातही तालुक्‍याच्या राजकारणातील दुष्काळ संपला पाहिजे. आमदार गणपतराव देशमुख ही व्यक्ती म्हणून चांगली असली तरी लोकांकडून अनेक प्रश्न मार्गी लागत नाहीत. यासाठी तालुका कॉंग्रेस पक्षाकडून दुष्काळाचा प्रश्न मिटेल या भावनेने 1986 ते 90 या काळात पाटील बंधूंनी गावोगावी जाऊन तरुणांची मोठी फळी निर्माण केली होती. या दुष्काळी लढ्यासाठी आमदार शहाजीबापू यांचे नाव जरी पुढे असले तरी या पाठीमागे बळ मात्र सुभाष नानांचे होते. 1990 ला शहाजीबापूंनी सुभाषनानांच्या आग्रहापोटी पक्षाच्या श्रेष्ठीकडे कॉंग्रेस पक्षाची तिकिटाची मागणी केली होती. यामध्ये विद्यार्थी संघटना व युवक कॉंग्रेसचा मोठे पाठबळ मिळाले होते. सांगोला सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातूनही पाटील बंधूंनी त्यावेळी प्रस्थापितांना निकराची झुंज दिली होती. 1995 च्या विधानसभा निवडणुकीतही सुभाषनानाने सुरुवातीपासूनच लक्ष घातले होते. सुरवातीपासून नेतृत्वाची आवड असली तरीसुद्धा बंधू प्रेमापोटी त्यांनी आपले ज्येष्ठ बंधू शहाजीबापू पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीकडे विशेष लक्ष दिले होते. 1995 च्या युवक कॉंग्रेसच्या व तालुक्‍यात उभारलेल्या तरुणांच्या चळवळीमुळे शहाजीबापू 192 मतांनी निवडून आले होते. या निवडणुकीत सुभाष नानाचा सिंहाचा वाटा होता. सुभाष नानांनी कधी स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही. आपले बंधू शहाजीबापू पाटील यांचे आमदारकीकडे विशेष लक्ष दिले होते. आमदारकीच्या निवडणुकीसाठी व इतर राजकीय कारकीर्द घडविण्यासाठी त्यांनी स्वतःची संपत्ती पणाला लावली होती. सुभाष नानाच्या निधनामुळे आमदार शहाजीबापू पाटील यांचे सच्चे पाठीराखे हरपले असल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. 

* ठळक बाबी - 

  • आमदार शहाजीबापू पाटील यांच्या निवडणुकीतील किंगमेकर म्हणून ओळख. 
  • शाहू शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना. 
  •  सुशीलकुमार शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, चिक-महूद. 
  •  यशवंत विद्यालय, शिरभावीची उभारणी 
  •  सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष 1995 
  • युवक अध्यक्षाच्या स्वतःच्या कारकीर्दीतच ज्येष्ठ बंधू आमदार शहाजीबापू पाटील 1995 च्या विधानसभा निवडणुकीत यश 
  •  कॉंग्रेसप्रणित सरपंच संघटेनेची स्थापना 
  •  सोलापुर जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष 1998. 

संपादन :  अरविंद मोटे 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com