चॅलेंज देऊन घडवला किणीच्या तरुणांनी इतिहास ! 11 पैकी नऊ जागा मिळवत सत्ताधाऱ्यांना बसविले घरी 

राजशेखर चौधरी 
Wednesday, 20 January 2021

किणी गावाची विकासाची गती जेमतेम आहे आणि तालुक्‍यात मोठा दखल घेण्यासारखा विकास होऊ शकेल असे वातवरण असूनही योग्य प्रयत्नाअभावी गाव विकासापासून कोसो दूर आहे, याचे शल्य काही युवकांमध्ये होते. त्यातच स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेत पुढाकाराने काम करणारे अमोल हिप्परगे यांना गावातील मित्र व तरुणांनी निवडणुकीत एकत्र येऊन पॅनेल करू, असे विचार मांडले आणि तिथूनच परिवर्तन पॅनेलने गावात आपले विचार रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

अक्कलकोट (सोलापूर) : किणी (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील तरुणांनी एकत्र येत ज्येष्ठांना आव्हान दिले आणि परिवर्तन पॅनेलची स्थापना केली. गावकऱ्यांनी या "परिवर्तन'च्या आवाहनास भरघोस प्रतिसाद देऊन गावच्या सत्तेत परिवर्तन घडवून आणले आणि 11 पैकी तब्बल 9 जागा त्यांना मिळवून देत इतिहास घडवला. 

किणीत या निवडणुकीपूर्वी अणप्पा अळ्ळीमोरे हे ग्रामपंचायत सदस्य होते तर दिगंबर पाटील हे सरपंच होते. पाटील यांनी निवडणुकीत पॅनेल न उभारता बाहेर राहिले. दरम्यान, अण्णप्पा अळ्ळीमोरे, स्वामीनाथ जाधव व इतरांनी एकत्र येत मल्लिकार्जुन पॅनेलच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनेल उभारून त्यांच्या विरोधात गावात कामे न झाल्याच्या तक्रारी करीत त्यांच्यावर असलेल्या नाराजीचा फायदा उठविण्यासाठी समविचारी तरुण एकत्र आले व गावात विकासाची वाट दाखविण्यासाठी पहिलाच प्रयत्न केला. नियोजनबद्ध प्रचार करीत गावकऱ्यांना आपलेसे केले आणि गावातील सत्ता हस्तगत केली. 11 पैकी 9 जागा मिळवत निर्णायक बहुमत मिळविले. 

किणी गावाची विकासाची गती जेमतेम आहे आणि तालुक्‍यात मोठा दखल घेण्यासारखा विकास होऊ शकेल असे वातवरण असूनही योग्य प्रयत्नाअभावी गाव विकासापासून कोसो दूर आहे, याचे शल्य काही युवकांमध्ये होते. त्यातच स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेत पुढाकाराने काम करणारे अमोल हिप्परगे यांना गावातील मित्र व तरुणांनी निवडणुकीत एकत्र येऊन पॅनेल करू, असे विचार मांडले आणि तिथूनच परिवर्तन पॅनेलने गावात आपले विचार रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू केले, असे त्यांचे कार्यकर्ते "सकाळ'शी बोलताना मत व्यक्त केले. 

याबाबत बोलताना हिप्परगे म्हणाले, आम्ही सकारात्मक विचार घेऊन योग्य दिशा देणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यातच गावातील पारंपरिक विरोधक दोघेही एक झाले आणि त्यांना वाटले, की आमचे आता कोणीही काही करू शकणार नाही आणि नेमकी हीच बाब तरुणांना किंबहुना गावकरी बंधूंना आवडली नाही. त्यांनी या आमच्या परिवर्तनाच्या प्रयत्नास भरघोस साथ दिली आणि आम्हाला मुर्गेंद्र स्वामी, संतोष अंबाडे, रत्नशील जैनजांगडे, रुद्रमनी स्वामी आदींच्या पुढाकारातून अमोल हिप्परगे, पूनम जैनजांगडे, प्राजक्ता जाधव, नूरदिन मत्तेखाने, मंजूर मत्तेखाने, ज्योती जाधव, गायत्री देडे, शेखर सोनकांबळे यांच्या रूपाने निर्णायक बहुमतापर्यंत पोचविले, याचा आम्हाला अभिमान वाटला आणि आता आम्ही दिलेला शब्द पूर्ण करण्यास प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि आमच्या नियोजनानुसार विकास करू, याची ग्वाही गावकऱ्यांना आम्ही देत आहोत. 

ही निवडणूक एक उदाहरण आहे 
ही निवडणूक ऐतिहासिक झाली, याचे कारण म्हणजे निवडणुकीसाठी कोणतीही रक्कम आम्ही खर्च केली नाही. गावकऱ्यांनी स्वतः वर्गणी गोळा केली आणि आम्हाला प्रचाराचे साहित्य छापून दिले व इतर मदत केली. आमचा जाहीरनामा आम्ही मांडला आहे, तो आम्ही पूर्ण करूच तसेच गावातील विकासाची दिशा असलेले तरुण एकत्र असल्यास निश्‍चित यशाचे ध्येय गाठू शकतो, याचे या वेळी झालेली निवडणूक हे एक उत्तम उदाहरण आहे. 
- अमोल हिप्परगे,
परिवर्तन पॅनेल 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kini youngsters made history by challenging Kini Gram Panchayat elections