किमया किसान रेल्वेची ! छोटी रेल्वे स्थानके बनली लोडिंग हब; नाशवंत शेतमालासाठी फायदेशीर 

Kisan_Railway
Kisan_Railway

सोलापूर : जिल्ह्यात किसान रेल्वेने शेतमाल वाहतूक करून देशातील मोठ्या बाजारपेठांमध्ये माल पोचविण्याची संधी दिली. पण त्यासोबत आता अगदी नव्याने जोडल्या गेलेल्या लहान रेल्वे स्थानकांवर देखील शेतीमाल वाहतूक वाढली आहे. जेऊर रेल्वे स्थानकावरून पेरू, सीताफळ व बोर यांसारख्या फळांची 578 टन वाहतूक करण्यात आली आहे. छोटी रेल्वे स्थानके आता शेतमाल वाहतुकीसाठी लोडिंग हब बनत आहेत. 

किसान रेल्वेमुळे ताज्या भाजीपाला आणि फळांची जलद वाहतूक होत आहे. छोट्या स्थानकांवर थांबे असल्याने लहान व सीमांतिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून चांगला नफा मिळवता येतो. वायफळ खर्च कमी, सुरक्षित आणि त्वरित पुरवठा यामुळे कमी खर्च होतो. यामुळे केवळ शेतकऱ्यांचे जीवनमानच बदलले नाही, तर छोटी रेल्वे स्थानके शेती उत्पादनांची मोठी लोडिंग हब बनली आहेत. 

यापूर्वी सांगोला, बलवडी, कोपरगाव, बेलापूर आणि मोडनिंब यांसारख्या गुड्‌स किंवा पार्सल वाहतूक नसलेल्या स्थानकांना सांगोला- मुझफ्फरपूर किसान रेल गाडीचा थांबा देण्यात आला. बंगळूर - आदर्शनगर - दिल्ली किसान रेल्वेला सांगोला व जेऊरसारख्या लहान-लहान स्थानकांवर थांबे देण्यात आले. या थांब्यांमुळे डाळिंब, पेरू, सीताफळे, केळी आणि इतर फळे, भाजीपाला, मासे आदी नाशवंत शेती उत्पादनांना विक्रीची मदत मिळाली. 

सांगोला स्थानकावरून आतापर्यंत एकूण 8 हजार 325 टन फळांची वाहतूक झाली आहे. सांगोला-मुझफ्फरपूर किसान रेल्वे सुरू झाल्यापासून बलवडी 175 टन, कोपरगाव 336 टन आणि बेलापूर 165 टन असा माल वाहतुकीसाठी पाठवला गेला. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील जेऊर स्थानकावर कोणतीही पार्सल लोडिंग सेवा नव्हती. परंतु बंगळूर - आदर्शनगर, दिल्ली किसान रेल्वे सुरू झाल्याने किसान रेल्वेच्या फेऱ्यांतून जेऊरमधून 578 टन फळे पाठवण्यात आली. 

ठळक... 

  • छोट्या स्थानकांवरील थांब्यांमुळे छोट्या शेतकऱ्यांसाठी किसान रेल ठरली वरदान 
  • 2020 मध्ये किसान रेल सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 8 हजार 325 टन फळांची वाहतूक 
  • किसान रेल छोट्या स्थानकांचे प्रमुख शेती उत्पादनांचे लोडिंग हबमध्ये रूपांतर करीत आहे 
  • जेऊर हे पेरू, सीताफळ, केळी, बोर, डाळिंब आदींचे मुख्य लोडिंग हब 

किसान रेल्वेमुळे पूर्वीच्या तुलनेत उत्पन्नात खरोखरच वाढ झाली आहे. डाळिंब आणि सीताफळे यांसारख्या शेतीच्या उत्पादनांमध्ये उशिरा वितरणामुळे, जास्त वाहतूक खर्च आणि जादा वाहतुकीच्या वेळेमुळे फळे खराब होत होती आणि त्यामुळे नुकसान होत होते. कमी खर्चात जलद, नवीन वितरणाने फळांची मोठ्या प्रमाणात वाहतूक उपयुक्त आहे. किसान विशेष सेवांच्या आदर्श नगर दिल्लीच्या अधिक फेऱ्या विचारात घ्याव्यात. 
- विजय लबडे, 
शेतकरी, ता. करमाळा 

किसान रेल्वेमुळे जेऊरच्या आसपासच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. कारण, शेतीतील उत्पादने ताजेतवाने आणि त्वरित पोचवली जात आहेत. ग्राहकांव्यतिरिक्त, कमी वाहतुकीच्या खर्चामुळे आता दिल्ली व उत्तर भारतात अखंड पुरवठा साखळी उभारण्यास मदत झाली आहे. 
- किरण डोके, 
शेतकरी, जेऊर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com