कोरवलीत डॉक्‍टर बंधूंनी केले सत्ता परिवर्तन ! कोरोना काळातील रुग्णसेवेची दिली ग्रामस्थांनी पोचपावती 

श्रावण तीर्थे 
Wednesday, 20 January 2021

कोरोना काळात गावातील रुग्णांचे उपचाराविना कोणत्याही प्रकारचे हाल होऊ दिले नाहीत. प्रसंगी रुग्णांच्या घरी जाऊन सेवा केली. याचीच परतफेड म्हणून गावकऱ्यांनी त्यांना संपूर्ण गावाची सर्व प्रकारची सेवा करण्याची संधी दिली आहे.

कोरवली (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरवली ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले आहे. डॉ. अमोल पाटील यांच्या श्री अमोगसिद्ध लोकशक्ती पॅनेल विरुद्ध राजशेखर पाटील यांचा श्री अमोगसिद्ध ग्रामविकास पॅनेल अशी दुरंगी लढत झाली. यात डॉ. अमोल पाटील गटाने 11 पैकी 9 जागा जिंकत सत्ता खेचून आणली. या निवडणुकीत डॉ. पाटील यांनी ग्रामस्थांना पारंपरिक आश्वासने न देता आधुनिक विकासाचे व्हीजन समोर ठेवून गावातील सुशिक्षित तरुण वर्गाला एकत्रित केले व गावाच्या विकासासाठी सुशिक्षित तरुणांना उमेदवारी देऊन विजयी करून आणले. 

डॉ. अमोल पाटील हे एम.डी. (पोटविकार तज्ज्ञ) वैद्यकीय क्षेत्रात उच्च विद्याविभूषित तरुण आहेत. सोलापूर येथे त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल आहे. पण गावाच्या विकासासाठी त्यांची सतत धडपड असते. गावातील नागरिकांची वैद्यकीय सोय व्हावी म्हणून ते सतत कोरवली गावामध्ये मोठे तज्ज्ञ डॉक्‍टर आणून आरोग्य शिबिरे भरवून गावकऱ्यांची वैद्यकीय सेवा करीत असतात. ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात गेलेली मुलं फारशी गावाकडे फिरकत नाहीत, पण डॉ. अमोल पाटील याला अपवाद ठरले. त्यांनी आपल्या गावाची नाळ कधीही तुटू दिली नाही. दर रविवारी गावी येऊन ते गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास अग्रेसर असतात. या सर्व कामात त्यांना त्यांचे बंधू डॉ. राहुल पाटील व वहिनी डॉ. सारिका पाटील यांची समर्थपणे साथ असते. 

कोरोना काळात या डॉक्‍टर परिवाराने "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा' मानून गावकऱ्यांच्या सेवेसाठी घरी लहान मुले व वृद्ध असतानादेखील स्वतःचे घर सोडून दुसऱ्या घरी हॉस्पिटल चालू करून रुग्णांची सेवा केली. गावातील रुग्णांचे उपचाराविना कोणत्याही प्रकारचे हाल होऊ दिले नाहीत. प्रसंगी रुग्णांच्या घरी जाऊन सेवा केली. याचीच परतफेड म्हणून गावकऱ्यांनी त्यांना संपूर्ण गावाची सर्व प्रकारची सेवा करण्याची संधी दिली आहे. कोरवली ग्रामपंचायतीवर गेली पंधरा वर्षे राजशेखर पाटील यांची एकहाती सत्ता होती. पण गत निवडणुकीत डॉ. अमोल पाटील यांनी गावाच्या विकासासाठी गावातील सुशिक्षित तरुणांना एकत्रित करून पैकी 11 जागा 9 जिंकत सत्ता परिवर्तन करून दाखवले. तर राजशेखर पाटील गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. 

श्री अमोगसिद्ध लोकशक्ती गटाचे प्रभागनिहाय विजयी उमेदवार याप्रमाणे 

  • प्रभाग एक : सिद्धेश्वर चंद्रकांत म्हमाणे, अमोल भीमू गेंगाणे, आशा ज्ञानेश्वर भोसले 
  • प्रभाग दोन : सुज्ञानी महादेव पाटील, दिगंबर महादेव राजमाने, काशीबाई लक्ष्मण नंदुरे, 
  • प्रभाग तीन : (राजशेखर पाटील गट) चिंगूबाई अशोक तीर्थे, अविनाश संदीपान गायकवाड 
  • प्रभाग चार : प्रीती संजय पाटील, रोहिणी दयानंद तारके, शशिकांत रंगसिद्ध कस्तुरे असे नऊ सदस्य निवडून आले. 

प्रभाग क्रमांक चारमधून विद्यमान सदस्य व राजशेखर पाटील यांचे पुतणे यांच्याकडे संपूर्ण पॅनेलची धुरा सांभाळणारे प्रमोद पाटील यांचा केवळ चार मतांनी झालेला पराभव हा जिव्हारी लागला आहे. तर शशिकांत कस्तुरे या सामान्य कार्यकर्त्याने प्रमोद पाटील यांचा पराभव करून जायंट किलर ठरत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. युवा वर्गही जुन्या राजकारण्यांना विकासाच्या मुद्द्यावर रोखून यश प्राप्त करू शकतात, हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे. या विजयामध्ये लोकशक्ती शुगरचे व्हाईस चेअरमन शिवानंद पाटील व कोरवलीचे माजी सरपंच सुरेश म्हमाणे, चन्नबसवेश्वर म्हमाणे, साधू पाटील, बाळासाहेब पाटील यांचे सहकार्य मिळाल्याचे डॉ. पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

जागतिक महामारीमध्ये माझा व माझ्या परिवाराचा थोडासा का होईना खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही रुग्णसेवा केली. आणि संपूर्ण गावकऱ्यांनी आम्हाला गावाची सेवा करण्याची संधी दिली. म्हणून आता सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास करणार. 
- डॉ. अमोल पाटील 
एम.डी. (पोटविकार तज्ज्ञ) 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Koravali Gram Panchayat election the Doctor brothers changed power