कुरनूर धरणात 88 टक्के पाणीसाठा; येत्या दोन दिवसांत धरण 100 टक्के भरण्याची शक्‍यता 

राजशेखर चौधरी 
Thursday, 1 October 2020

अक्कलकोट तालुक्‍याची वरदायिनी असलेले कुरनूर धरण आज (गुरुवारी) सकाळी दहापर्यंत 88 टक्के भरले असून, धरण लाभक्षेत्रातील पाठीमागून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह पाहता येत्या दोन दिवसांत धरण 100 टक्के भरण्याची शक्‍यता आहे. शहरवासीय व शेतकऱ्यांचे लक्ष धरणाच्या शंभरीकडे लागून राहिले आहे. 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍याची वरदायिनी असलेले कुरनूर धरण आज (गुरुवारी) सकाळी दहापर्यंत 88 टक्के भरले असून, धरण लाभक्षेत्रातील पाठीमागून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह पाहता येत्या दोन दिवसांत धरण 100 टक्के भरण्याची शक्‍यता आहे. शहरवासीय व शेतकऱ्यांचे लक्ष धरणाच्या शंभरीकडे लागून राहिले आहे. 

जर धरण पूर्ण क्षमतेने भरले तर पुन्हा एक वर्ष शेतकरी व नागरिकांची पाण्याची चिंता नाहीशी होणार आहे. तुळजापूर तालुक्‍यातील नळदुर्ग येथील नर व मादी धबधबा मंगळवारपासून वाहू लागले आणि कुरनूर धरण शंभर टक्के भरेल अशी आशा निर्माण झाली आहे. मागील चार-पाच दिवसांत तुळजापूर तालुक्‍यात व लाभक्षेत्रात पडलेल्या पावसामुळे कुरनूर धरण आज तब्बल 88 टक्के इतके भरले आहे. धरणाची एकूण क्षमता ही 822 दशलक्ष घनफूट इतकी आहे. त्यापैकी बुधवारी दुपारपर्यंत 720 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह अक्कलकोट, दुधनी व मैंदर्गी शहरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

सध्या हन्नूर येथील हरणा नदी आणि चुंगी येथील बोरी नदी या दोघांचाही प्रवाह चालू आहे. पाण्याचा प्रवाह देखील ठीक आहे. असाच प्रवाह आणखी एक-दोन दिवस राहिल्यास धरण दोन दिवसांत शंभर टक्के भरण्याची आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परतीच्या उर्वरित हस्त व चित्रा नक्षत्राच्या पावसावर आता धरणातून खाली असणाऱ्या आठ बंधाऱ्यांत पाणी सोडण्याचे सर्व काही अवलंबून राहणार आहे. सध्या अक्कलकोट तालुक्‍यात चार-पाच दिवसांपासून पाऊस थंडावला आहे. दरम्यान, आज गुरुवारी सकाळी पुन्हा पावसाचे आगमन झाले असून धरण शंभर टक्के भरल्यास खालील सर्व बंधाऱ्यांत पाणी सोडता येणार आहे. त्याने त्या नदीकाठच्या नागरिकांना व शेतीसाठी पाणी मिळणार आहे. 

शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार 
कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील धरण येत्या दोन दिवसांत 100 टक्के भरेल आणि वरून आणखी पाऊस होऊन जादा पाणी धरणात आल्यास पाणी खाली सोडावे लागणार आहे. त्याने तालुक्‍याच्या 40 हून अधिक बोरी नदीकाठच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि नदीकाठच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. यामुळे सांगवी, बणजगोळ, मिरजगी, सातनदुधनी, संगोगी, रुद्देवाडी व बबलाद हे सर्व बंधाऱ्यांसह अक्कलकोट, दुधनी व मैंदर्गी नगरपरिषद आणि नदीकाठच्या शेतकरी व नागरिकांना आणखी जादा पाणी उपलब्ध होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kurnoor dam likely to be hunderd percent full in next two days