
बोरामणी विमानतळाच्या उभारणीसाठी होत असलेल्या भूसंपादनाच्या अंतिम टप्प्यातील भूमी अधिग्रहणाचे काम नव्या वर्षाच्या सुरवातीला पूर्ण होत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एकूण 29 हेक्टर भूसंपादन थेट पद्धतीने खरेदीखताच्या आधारे केले जाणार आहे.
सोलापूर : बोरामणी विमानतळाच्या उभारणीसाठी होत असलेल्या भूसंपादनाच्या अंतिम टप्प्यातील भूमी अधिग्रहणाचे काम नव्या वर्षाच्या सुरवातीला पूर्ण होत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एकूण 29 हेक्टर भूसंपादन थेट पद्धतीने खरेदीखताच्या आधारे केले जाणार आहे. त्यानंतर विमानतळाच्या बाबतीत पुढील विकासकामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
बोरामणी विमानतळासंदर्भात मागील काही वर्षांपासून भूसंपादनाचे काम सुरू आहे. त्यामध्ये शेवटच्या टप्प्यात ही प्रक्रिया नव्या नियमानुसार केली जाणार आहे. वर्ष 2014 मध्ये शासनाने भूसंपादनाच्या प्रक्रियेबाबत नव्याने आदेश काढले आहेत. त्यानुसार भूसंपादन न करता थेट शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदीखत करून दिले जाणार आहे. तसेच मोबदल्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या प्रकियेत या वेळी एकूण 20 उतारे असलेल्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा लाभ दिला जाणार आहे. बागायती, जिरायती या दोन प्रकारातील जमिनीनुसार भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे.
ठळक बाबी
प्रकल्प विकासाच्या टप्प्यात
यानंतर राज्य विमानसेवा प्राधिकरणाकडून भूसंपादनाची प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे आता प्राधिकरण हे विमानतळाच्या पुढील टप्प्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. प्राधिकरण याबाबत प्रस्ताव तयार करून शासनाकडे मागणी करणार आहे. या प्रकल्पातील सर्वात किचकट प्रक्रिया भूसंपादन असल्याने ती आता पूर्ण होत आहे. आता थेट विकासाच्या टप्प्यात हा प्रकल्प पोचला आहे.
बोरामणी विमानतळासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
- सज्जन निचळ,
व्यवस्थापक, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण
संपादन : श्रीनिवास दुध्याल