उजनी परिसरात विदेशी "चक्रवाक', "पट्ट कदंब' दाखल: मात्र फ्लेमिंगोचे आगमन लांबणीवर ! 

Birds
Birds

केत्तूर (सोलापूर) : गेल्या काही दिवसांपूर्वी उजनी धरणातून सोडलेल्या पहिल्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या पोषक वातावरणाने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परदेशी पक्षी दाखल होत आहेत. धरणातून शेतीला पाणी सोडल्याने जलाशयाचा काठ उघडे पडले. त्यामुळे दलदल तयार होऊन पक्ष्यांना खाद्यान्न उपलब्ध होत आहे. पक्ष्यांना आवडणारा चराऊ भाग पाण्यापासून मुक्त होत आहे, परिणामी अनेक प्रजातींच्या हजारो पक्षी उजनीवर आश्रय घेण्यासाठी सरसावत आहेत. 

हिमालयातील मानसरोवर व तिबेटातील पाणथळांवरील पट्टकदंब हंस (बार हेडेड गूज) व चीन, मंगोलियातून चक्रवाक (रुडी शेल्डक) येऊन दाखल झाले आहेत. पांढरेशुभ्र डोके, त्यावर दोन काळ्या समांतर पट्ट्या ही कदंब हंस ओळखण्याची खूण आहे. हळदीकुंकू या स्थानिक पक्ष्यापेक्षा मोठ्या आकाराचे शरीर असलेल्या या हंसाला गुलाबी चोच व नारंगी रंगाचे पाय असतात. जलाशयाच्या काठावर दलदल भागावर व गाळपेर शिवारात खाद्यान्न शोधताना या परदेशी पक्ष्यांचे दृश्‍य अत्यंत मनमोहक असते. 

प्रणयी जोडी म्हणून ख्याती असलेले चक्रवाक अर्थात ब्राह्मणी बदक हे देखणे पक्षी मंगोलियातून उजनी काठावर या आठवड्यात येऊन दाखल झाले आहेत. स्थानिक बदकांपेक्षा मोठ्या आकाराची ही बदके सोनेरी रंगाची असतात. त्यांची चोच काळी तर पाय पुसट पांढरे असतात. नर चक्रवाक बदकाच्या गळ्यात काळा गोफ असतो. 

फ्लेमिंगोंचे आगमन अद्याप प्रतीक्षेत 
उजनी जलाशयाच्या सौंदर्यातील मुख्य घटक म्हणून ओळख असलेले फ्लेमिंगो अर्थात रोहित अद्याप आलेले नाहीत. उत्तरेकडे हिमवर्षावाला सुरवात झालेली असून त्यांच्या प्रवासाला अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे येत्या पंधरवड्यात उजनीत दाखल होतील, असा अंदाज पक्षी निरीक्षक व्यक्त करत आहेत. 

फ्लेमिंगोसह मुग्धबलाक, कांड्या करकोचे, पाणलावा, पाणटिवळा, सरग, बाड्डा आदी बदके आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत. स्थानिक पक्ष्यांचा मोठा वावर चित्रबलाक, नळ्या, पाणकावळे, शेकाट्या वारकरी, राखी बगळे, हळदीकुंकू बदके लक्षणीय संख्येने सध्या धरण क्षेत्रात आढळून येत आहेत. हिवाळ्यात येऊन उन्हाळा संपेपर्यंत भारतातील अन्य राज्यांतून येणाऱ्या जांभळी बगळ्यांच्या अनेक जोड्या पाणलोट क्षेत्रात दिसून येत आहेत. मात्र युरोपातून दरवर्षी खास करून उजनीतील चिलापी माशांची चव चाखण्यासाठी येणाऱ्या मत्स्यघारीने (ऑस्प्रे) मात्र यावर्षी वारी चुकवली आहे. 

उजनीवरील पक्षी सौंदर्याची ठिकाणे 
करमाळा तालुक्‍यातील कोंढार चिंचोली, टाकळी, कात्रज, रामवाडी, खातगाव, केत्तूर, गोयेगाव, वाशिंबे, केडगाव, कुगाव तसेच डिकसळ जवळच्या रेल्वेच्या जुन्या पुलाजवळचा परिसर आणि इंदापूर तालुक्‍यातील कुंभारगाव व पळसदेव या ठिकाणी विविधरंगी पक्ष्यांचा वावर पाहायला मिळतो. 

यावर्षी उजनी लाभक्षेत्रात विपुल पाऊस झाला. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याची गरज भासत नसल्याने धरणातून पाणी सोडले नाही. दरवर्षी डिसेंबरमध्ये सुमारे 80 ते 90 टक्के धरण भरलेले असते व जलाशयाच्या काठावर अनुकूल परिस्थती निर्माण होऊन पक्ष्यांना खाद्य उपलब्ध होत असते. मात्र यावर्षी सध्या धरणात 100 टक्‍क्‍यांहून अधिक पाणी साठून राहिल्याने पक्ष्यांचा चराऊ भाग अद्याप पाण्याखाली बुडून आहे. त्यामुळे पक्ष्यांनी धरणाकडे पाठ फिरवली आहे. पुढील काही दिवसांत फ्लेमिंगोसह अन्य स्थलांतरित पक्षी येण्याची शक्‍यता आहे. 
- डॉ. अरविंद कुंभार,
ज्येष्ठ पक्षी अभ्यासक 

सध्या उजनी जलाशयाचा पाणीसाठा आजही जवळजवळ 120 टक्‍क्‍यांपर्यत आहे, त्यामुळे पाणथळ जागा व दलदलीच्या जागा अल्प प्रमाणात रिकाम्या झाल्या आहेत. हवामान बदलामुळे उजनीचे वैभव व आकर्षण समजल्या जाणाऱ्या फ्लेमिंगो या पक्ष्याचे आगमन मात्र लांबणीवर पडले आहे. असे असले तरी ते निश्‍चितच येतील. उजनी जलाशयावर सध्या युरोप, सैबेरिया येथून पक्ष्यांचे आगमन झाले आहे व आणखीही होत आहे. 
- कल्याणराव साळुंके,
पक्षीप्रेमी, कुंभेज 

नेहमीप्रमाणे उजनी जलाशयावर जरा उशिरानेच विदेशी पक्षी दाखल होत आहेत. हे पक्षी उजनीचे आकर्षण आहेत. हे पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमी, पर्यटक व हौशी पर्यटक आवर्जून हजेरी लावतात. त्यांच्या व पक्ष्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वांचीच आहे. 
- राहुल इरावडे,
पक्षीप्रेमी, केत्तूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com