मोठी बातमी! महापालिकेतील 'एवढे' कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर

तात्या लांडगे
Tuesday, 18 August 2020

माहिती घेऊन बदल्या केल्या जातील
तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करुनही बदली न झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाकडून सुरु आहे. तीन वर्षे पूर्ण झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येईल.
- पी. शिवशंकर, आयुक्‍त, सोलापूर महापालिका

सोलापूर : राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार शासकीय कर्मचाऱ्यांची तीन वर्षांनंतर बदली होणे बंधनकारक आहे. मात्र, सोलापूर महापालिकेतील कर वसुली, हद्दवाढ, अकाउंट, उद्यान, मंडई, सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगरअभियंता यासह विभागीय कार्यालयांतील सुमारे 234 कर्मचारी पाच ते सात वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. तत्कालीन आयुक्‍त दीपक तावरे यांनी अशा कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून त्यांची बदली करण्याचे निर्देश दिले. मात्र, अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही.

मागील वर्षी स्थानिक संस्था कर आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला प्रत्येकी 11 कोटींचे, कर आकारणी विभागास 155 कोटी, हद्दवाढ विभागाला 125 कोटी, भूमी व मालमत्ता विभागाला 43.60 कोटी, मंडई विभागास अडीच कोटी, नगरअभियंता विभागास 80 कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्टे देण्यात आले होते. मात्र, त्यातून 50 टक्केही कर वसूल झाला नाही. विशेषत: याच विभागात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. तीन वर्षाला बदली होणे अपेक्षित असतानाही काही कर्मचाऱ्यांना चार ते सहा वर्षे झाली आहेत. तरीही त्यांची इतरत्र विभागात बदली करण्यात आलेली नाही. यावर्षी एप्रिल महिन्यात महापालिकेला चार लाख 16 हजार 185 रुपयांचा कर मिळाला. तर मे महिन्यात पाच कोटी नऊ लाख रुपये, जून आणि जुलै महिन्यात पाच कोटींचा महसूल मिळाला आहे. वास्तविक पाहता महापालिकेला दरमहा सरासरी 40 कोटींचा महसूल जमा होणे अपेक्षित आहे. दरम्यान, वर्षानुवर्षे त्याच पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून कर वसुलीसाठी ठोस प्रयत्न होत नसल्याचेही चित्र आहे.

 

बाह्य कर्ज काढण्याचा निर्णय विचाराधिन
भांडवली कामे करुनही कंत्राटदारांची थकलेली बिले महापालिकेला वेळेत देता आलेली नाहीत. शहरातील नगरसेवकांना 20 लाख तर हद्दवाढ भागातील नगरसेवकांना विकास कामांसाठी प्रत्येकी 30 लाखांचा निधी देण्याचा निर्णय झाला. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे तो देता आलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही महापालिकेकडे पुरेसा पैसा नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी वाट पाहावी लागत असून पेन्शन विक्रीही थांबविण्यात आली आहे. परिवहन विभागावरील आर्थिक बोजा कमी न झाल्याने तो विभाग गाशा गुंडाळण्याच्या तयारीला लागला आहे. शहराअंतर्गत आणि हद्दवाढ भागात विकासकामे झाली नसल्याने नागरिकांनीही कर भरण्याकडे पाठ फिरविली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आता बाहेरुन कर्ज काढण्याच्या तयारीत असून त्याबद्दलचा निर्णय विचाराधिन असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

माहिती घेऊन बदल्या केल्या जातील
तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करुनही बदली न झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाकडून सुरु आहे. तीन वर्षे पूर्ण झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येईल.
- पी. शिवशंकर, आयुक्‍त, सोलापूर महापालिका

बदली न झालेल्या कर्मचाऱ्यांची स्थिती
झोन कार्यालय
89
अकाउंट
13
कर वसुली
37
हद्दवाढ
19
अन्य विभाग
76  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the last five to seven years, 234 employees of Solapur Municipal Corporation have been deployed in one place