कोरोनाच्या नावाने सरकारने केलेल्या दंड वसुलीत नाही पारदर्शकता ! ऍड. सरोदे यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका 

अभय जोशी 
Saturday, 6 March 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, त्यामध्ये कोणतीही पारदर्शकता नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती संविधान तज्ज्ञ व मानवाधिकार विश्‍लेषक ऍड. असीम सरोदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, त्यामध्ये कोणतीही पारदर्शकता नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती संविधान तज्ज्ञ व मानवाधिकार विश्‍लेषक ऍड. असीम सरोदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

ऍड. सरोदे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वांनी मास्क घातला पाहिजे. परंतु मास्क घातला नाही या कारणावरून ठिकठिकाणी वेगवेगळ्या रकमेची दंडात्मक कारवाई केली जात आहे. दंड वसुलीसाठी टार्गेट दिले जात असून टार्गेटची पूर्तता करण्यासाठी ठिकठिकाणी दंड वसूल केला जात आहे. दंडात्मक कारवाईतून जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांचा अद्याप हिशेब जाहीर करण्यात आलेला नाही. हे लक्षात घेऊन आम्ही लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती प्रबोधन उपक्रमद्वारे दंड आकारणीमध्ये पारदर्शकता नसल्याबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. 

ऍड. सरोदे म्हणाले, "दुष्काळ आवडे सर्वांना' या ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या पुस्तकाचा उल्लेख करून आम्ही याचिकेत नमूद केले आहे, की कोरोनाचा काळ केंद्र सरकारने नागरिकांची वैयक्तिक माहिती गोळा करणे व त्यांच्याकडून भीतीचे वातावरण तयार करून पैसा गोळा करण्यासाठी केला आहे. तर राज्य सरकारचे पोलिस दंड आकारून श्रीमंत झाले तसेच विविध राजकीय पक्षांच्या महानगरपालिका, नगरपालिका यांनीही मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या नावाखाली प्रचंड पैसा जमवला आहे. 

मूकबधिर असलेल्यांना विशेष चिन्ह असलेले मास्क सामाजिक न्याय विभागाने द्यावेत, दंड म्हणून जमा करण्यात आलेल्या पैशातून गरीब, बेघर, दारिद्य्र रेषेखालील परिवारांना मास्क वाटप करावे, अशी मागणी आम्ही केली आहे. 

जनहित याचिकेत ऍड. असीम सरोदे, ऍड. अजिंक्‍य उडाने वकील म्हणून काम पाहात आहेत. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या ऍड. रमा सरोदे, पंढरपूर येथील ऍड. संदीप रणवरे उपस्थित होते. 

जनहित याचिकेतील मुख्य मुद्दे... 

  • एकाच वेळी पोलिस व महानगरपालिका, नगरपरिषद यांच्याकडून मास्क न घालणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला 
  • मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करणारी नेमकी ऍथॉरिटी कोण? 
  • मागील वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड पैसा दंडाच्या स्वरूपात जमा झालेला आहे 
  • महाराष्ट्रात पोलिसांनी किती दंड जमा केला व महानगरपालिका, नगरपरिषदा यांनी किती दंड जमा केला याची माहिती न्यायालयात द्यावी 
  • जर मास्क वापरला नाही म्हणून दंड केला तर मग मास्क न वापरणाऱ्याला त्वरित पोलिसांनी व इतर सरकारी संस्थांनी मास्क का दिले नाहीत? 
  • दंडाच्या करोडो रुपयांच्या रकमेचा वापर लोकांच्या आरोग्यासाठीच करावा 
  • महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण किती दंडाची रक्कम जमा झाली ते परदर्शकपणाने जाहीर करावे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lawyer Asim Sarode filed a petition in the court alleging lack of transparency in the collection of fines by the government in the name of Corona