नुकसानग्रस्तांना द्या प्रत्येकी 10 हजाराची मदत! 10 टक्केही पंचनामे झाले नसल्याची दरेकर यांची धक्कादायक माहिती

तात्या लांडगे
Tuesday, 20 October 2020

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने पिचला आहे. हातात आलेले पीक वाहून गेल्याने त्यांना प्रत्येकी 10 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापुरात केली.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने पिचला आहे. हातात आलेले पीक वाहून गेल्याने त्यांना प्रत्येकी 10 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापुरात केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वर्षांपुर्वी नुकसानग्रस्त बळीराजाला हेक्टरी 25 ते 50 हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पुर्तता करावी, हिच भाजपची मागणी आहे, असेही दरेकर म्हणाले. राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री, बिहार आणि मुंबई पोलीस असा वाद उभा करुन मूळ विषयाला फाटा फोडला जात आहे. अन्नदात्यासाठी कर्ज काढून मदत करायला काय अडचण आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थीत केला. केंद्र सरकार मदत करेल, पण तुम्ही तातडीची मदत द्या, अशी मागणीही त्यांनी केली. राज्य सरकार पंचनामे केल्याशिवाय मदत करत नाही, मग केंद्र सरकारकडून का तत्काळ मदत मागताय. पंचनामे तातडीने करा म्हणताय आणि दुसरीकडे मात्र, 10 टक्केही पंचनामे झालेले नाहीत. लवकर मदत करा, अन्यथा शेतकरी तुम्हाला जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भाजप टोकाची भूमिका घेईल
बळीराजाला भूक लागली आहे तर त्यांना तत्काळ मदत करा. अन्यथा विरोधक म्हणून आम्ही बळीराजाला सोबत घेऊन टोकाची भुमीका घेऊ, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला. तीन हजार 800 रुपयांची मदत करण्यापेक्षा मदत देऊ नका. तो जागाचा पोशिंदा आहे, त्याची थट्टा करु नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी सरकारला केले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leader of Opposition Pravin Darekar visit to Solapur district