असा करा जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाइन अर्ज ! त्यासाठी लागतात "ही' कागदपत्रे 

Phephar
Phephar

सोलापूर : ग्रामीण भागातील वंशपरांगत शेतजमीन किंवा मालकी हक्क ज्याच्या नावावर आहे ती शेतजमीन मूळ मालकाच्या मृत्यनंतर त्याच्या वारसदारांना त्या जमिनीवर वारसदार म्हणून नोंदणी कशी करायची, याबाबत अनभिज्ञता दिसून येते. प्रसंगी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवणे सुरू होते. मात्र शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी, हे माहीत असणे गरजेचे आहे. आता जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाइन अर्जही करता येतो. ऑनलाइन अर्ज कसा व कुठे करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्रे हवीत? त्याची प्रक्रिया काय आहे? याबाबत जाणून घ्या... 

वारसाच्या नोंदीसाठी आवश्‍यक गोष्टी 

  • खातेदाराचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांच्या आत वारस नोंदणीकरिता अर्ज देणे अपेक्षित असते. 
  • अर्जात मृत खातेदार किती तारखेस मयत झाला आहे? त्याच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती क्षेत्र आहे? मयत खातेदारास एकूण किती जण वारस आहेत याची माहिती असते. 
  • अर्जासोबत मृत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला, त्याच्या नावावरील जमिनीचे "8 अ'चे उतारे, सर्व वारसांचे पत्ते, वारसाचे मयत व्यक्तीबरोबर असलेले नाते व शपथेवरील प्रतिज्ञापत्र सादर केले पाहिजे. 
  • व्यक्तीचा जो धर्म आहे त्या कायद्यानुसार नोंद होत असते. हिंदू व्यक्तीबाबत हिंदू तर मुस्लिम व्यक्तीबाबत मुस्लिम वारस कायद्याचे नियम पाळले जातात. 

वारसाच्या नोंदीची प्रक्रिया... 

  • सर्वप्रथम मयत खातेदाराचा मृत्यू दाखला वारसांनी काढावा. मृत्यूनंतर तीन महिन्यांच्या आत सर्व वारसांची नावे नमूद करून वारस नोंदीसाठी अर्ज सादर करावा. 
  • वारस नोंदीसाठी आलेल्या अर्जाची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते. नंतर वारसांना बोलावले जाते. गावातील सरपंच, पोलिस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांना विचारणा करून वारसांनी अर्जात दिलेल्या माहितीची चौकशी करून वारस रजिस्टरमध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टर नोंद घेतली जाते. नंतर सर्व वारसांना नोटीस दिली जाते. 
  • किमान 15 दिवसांनंतर या फेरफार नोंदीबाबत कायदेशीररीत्या आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद प्रमाणित किंवा रद्द केली जाते. 

वारस प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे 

  • विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टम्प लावलेला अर्ज व शपथपत्र 
  • मृत्यू प्रमाणपत्र 
  • तलाठी अहवाल / मंडल अहवाल 
  • शासकीय नोकरीस असल्याचा पुरावा (उदा. : सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा) 
  • मृत व्यक्ती पेन्शनधारक असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटचे पेन्शन उचलले त्या पानाची प्रत 
  • शिधापत्रिकेची (रेशन कार्ड) प्रत 
  • ग्रामपंचायत/नगरपालिका यांचा जन्म-मृत्यूचा नोंद वहीतील उतारा 
  • सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यातील वारसाचे नाव लिहिलेला असल्याचा पुरावा 
  • वारस हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी (वारस हक्क व नॉमिनी हे दोन्ही वेगळे असतात) 
  • बॅंक, विमा रक्कम आदींबाबत नॉमिनी म्हणजे मृत्यूनंतर संबंधित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी असे नमूद असलेले नाव त्यालाच ती मिळते. 
  • विमा पॉलिसीधारकाने आत्महत्या केल्यास विमा क्‍लेम रक्कम ही नॉमिनी असलेल्या व्यक्तीला मिळत नाही 
  • वारस हक्क प्रमाणपत्र व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद, वहिवाट आदी बाबींसाठी महत्त्वाचे असते. 

असा करा जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाइन अर्ज... 

  • हा अर्ज करण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करा. 
  • त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. 
  • या पेजवर तुम्हाला खालच्या बाजूला एक "7/12 दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली' अशी सूचना दिसेल व त्याखाली एक लिंक दिलेली असेल. 
  • https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर क्‍लिक करा. 
  • त्यानंतर तुमच्यासमोर "पब्लिक डेटा एन्ट्री' नावानं एक पेज ओपन होईल. यावरील "Proceed to login' या पर्यायावर क्‍लिक केलं की तिथं तुम्हाला आधी तुमचं अकाउंट तयार करावं लागेल. त्यासाठी "Create new user' यावर क्‍लिक करा. 
  • मग "New User Sign Up' नावाचं नवीन पेज उघडेल. 
  • इथं तुम्हाला सुरवातीला तुमचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर लॉग-इन डिटेल्समध्ये User name टाकून check availability या पर्यायावर क्‍लिक करायचं आहे. त्यानंतर पासवर्ड टाकून तो परत एकदा टाकायचा आहे. मग Security Questions ध्ये एक प्रश्न निवडून त्याचं उत्तर द्यायचं आहे. 
  • ही माहिती भरून झाली की पुढे मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पॅन कार्ड नंबर आणि पिन कोड टाकायचा आहे. पिन कोड टाकला की देश, राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल. त्यानंतर Select City ध्ये तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे. 
  • त्यानंतर Address Details ध्ये घर क्रमांक आणि गल्लीचं नाव किंवा घरावर काही नाव असेल तर ते टाका. 
  • सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे आणि मग save बटण दाबायचं आहे. 
  • त्यानंतर या पेजवर खाली "Registration Successful. Please Remember Username & Password for Future Transaction' असा लाल अक्षरातला मेसेज तुम्हाला दिसेल. 
  • त्यानंतर तुम्हाला "Back' या पर्यायावर क्‍लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करायचं आहे. 
  • आता आपण नोंदणी करताना टाकलेलं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग-इन करायचं आहे. 
  • त्यानंतर "Details' नावाचं एक पेज तुमच्यासमोर उघडेल. इथं Registration, Marriage, e-filing, 7/12 mutations असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील. याचा अर्थ इथं तुम्हाला या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातल्या "7/12 mutations' वर क्‍लिक करायचं आहे. 
  • त्यानंतर तुम्हाला युजरचा प्रकार निवडायचा आहे. सामान्य नागरिक असाल तर "User is Citizen' आणि बॅंकेचे कर्मचारी असाल तर "User is Bank' या पर्यायावर क्‍लिक करायचं आहे. 
  • एकदा युजरचा प्रकार निवडला की त्यानंतर "Process' या पर्यायावर क्‍लिक करायचं आहे. 
  • त्यानंतर तुमच्यासमोर "फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क' नावाचे पेज ओपन होईल. 
  • इथं सुरवातीला गावाची माहिती भरायची आहे. जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे. 
  • त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की, "तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा' असा मेसेज तुम्हाला दिसेल. 
  • आता आपल्याला वारस नोंद करायची असल्यामुळे आपण "वारस नोंद' हा पर्याय निवडला आहे. 
  • त्यानंतर वारस फेरफार अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं तुम्हाला सुरवातीला अर्जदाराची माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, वडील किंवा पतीचं नाव आणि आडनाव, अर्जदाराचा ई-मेल आणि मोबाईल नंबर टाकून "पुढे जा' या पर्यायावर क्‍लिक करायचं आहे. 
  • त्यानंतर स्क्रीनवर आपला अर्ज मसुदा जतन केला आहे असा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक दिलेला असेल. या मेसेजखालील "ओके' बटणावर क्‍लिक करायचं आहे. त्यानंतर मृताचे नाव किंवा खाते क्रमांक टाकायचा आहे. सात- बाऱ्यावरील खाते क्रमांक इथं टाकणं अपेक्षित आहे. 
  • पुढे "खातेदार शोधा' या पर्यायावर क्‍लिक करायचं आहे. त्यानंतर मृताचे नाव निवडायचं आहे. एकदा ते नाव निवडलं की संबंधित खातेदाराच्या नावे असलेला गट क्रमांक निवडायचा आहे. नंतर मृत्यू तारीख टाकायची आहे. 
  • त्यानंतर "समाविष्ट करा' या पर्यायावर क्‍लिक करायचं आहे. त्यानंतर मग निवडलेल्या खातेधारकाच्या जमिनीची सविस्तर माहिती तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. 
  • त्यानंतर अर्जदार हा वारसांपैकी आहे का? असा प्रश्न तिथं विचारण्यात येईल. तुम्ही वारसांपैकी असाल तर होय, नसाल तर नाही या पर्यायावर क्‍लिक करायचं आहे. 
  • त्यानंतर वारसांची नावे भरा या पर्यायावर क्‍लिक करायचं आहे. 
  • इथं आता तुम्हाला वारस म्हणून जी नावं लावायची आहेत, त्यांची माहिती भरायची आहे. यात नाव, वडील किंवा पतीचं नाव, आडनाव लिहायचं आहे. पुढे धर्म निवडायचा आहे, तुमच्या धर्मानुसार वारस कायद्याचे नियम पाळले जातात. त्यानंतर इंग्रजीत नाव लिहायचं आहे आणि मग जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर तुमचं वय आपोआप तिथं येईल. पुढे मोबाईल नंबर आणि पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकला की राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल. 
  • पुढे पोस्ट ऑफिस निवडायचं आहे. त्यानंतर तालुका, गाव, घर क्रमांक आणि गल्लीचं नाव टाकायचं आहे. पुढे मयताशी असलेलं नातं निवडायचं आहे. 
  • मुलगा, मुलगी, विधवा पत्नी, नातू, नात, सून असं जे नातं असेल ते निवडायचं आहे. यापैकी नाते नसल्यास सगळ्यात शेवटच्या "यापैकी नसल्यास' या पर्यायावर क्‍लिक करायचं आहे आणि मग वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 आणि वर्ग-4 मध्ये दिलेल्या नात्यांपैकी एक नातं तुम्ही निवडू शकता. 
  • त्यानंतर खालच्या रकान्यात तुम्हाला आता वारसासंदर्भात भरलेली माहिती दिसून येईल. त्यानंतर दुसऱ्या वारसाचं नाव नोंदवायचं असेल तर तिथं असलेल्या पुढील वारस या पर्यायावर क्‍लिक करायचं आणि आता जशी माहिती भरली तशीच माहिती त्या वारसासंदर्भात भरायची आहे आणि "साठवा' या पर्यायावर क्‍लिक करायचं आहे. 
  • अशा रीतीनं सगळ्या वारसांची नावे भरून झाली की "पुढे जा' या पर्यायावर क्‍लिक करायचं आहे आणि कागदपत्रे जोडायची आहेत. 
  • इथं तुम्हाला मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करायची आहे. ही प्रत ग्रामपंचायत कार्यालयात मिळते. इतर कागदपत्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्याच्या हेतूने रेशन कार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे "8 अ'चे उतारेही तुम्ही जोडू शकता. 
  • तसेच एका कागदावर एक शपथपत्र लिहून ते इथे जोडणे अपेक्षित असते. यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नावे, त्यांचा पत्ता नमूद करणे गरजेचे असते. 
  • कागदपत्रे जोडल्यानंतर तिथं फाईल अपलोड झाली असा मेसेज येतो. 
  • त्यानंतर तुम्हाला तिथं एक स्वयंघोषणापत्र दिसेल. 
  • सगळ्यात शेवटी या पत्राच्या खालील सहमत आहे / Agree या पर्यायावर क्‍लिक करायचं आहे. त्यानंतर वारस नोंदीसाठीचा तुमचा अर्ज गावातल्या तलाठी कार्यालयात जमा केला जाईल. 
  • त्यानंतर तिथं या अर्जाची छाननी केली जाते आणि पुढील प्रक्रिया करून सात-बारा उताऱ्यावर वारसांची नावे नोंदवली जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com