मोठी ब्रेकिंग! वृक्ष तर सोडा, लागवड झालेल्या ठिकाणी खड्डेही नाहीत

तात्या लांडगे
Sunday, 13 September 2020

संबंधित विभागाकडून काहीच निरोप
सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार नोव्हेंबर 2019 मध्ये आठ हजार वृक्ष लागवडीची चौकशी करण्यासाठी आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्‍त झाली. मात्र, संबंधित विभागाकडून काहीच कार्यवाही झालेली नाही. उद्यान विभागाशी संबंधित तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतेही पत्र तथा बैठकीसाठी पत्र दिले नाही. 
- संदीप कारंजे, नगरअभियंता, सोलापूर महापालिका

सोलापूर : महापालिकेच्या उद्यान विभागाने 15 हजारांपैकी आठ हजार झाडांचीच लागवड झालीच नाही, असा आरोप काही नगरसेवकांनी केला. त्यानंतर 11 नोव्हेंबर 2019 च्या सर्वसाधारण सभेत समिती स्थापन करुन अहवाल सभागृहात सादर करण्याचा निर्णय झाला. मात्र, कोरोनापूर्वी आणि आता कोरोना काळात त्याबद्दल काहीच कार्यवाही झाली नाही. तत्पूर्वी, मुळात वृक्ष लागवड झाल्याच्या ठिकाणी वृक्ष तर सोडाच खड्डेही नाहीत, अशी माहिती समितीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

राज्य शासनाने 2019 मध्ये राज्यभरात 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत सोलापूर महापालिकेने 75 लाख रुपयांची 15 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे घेतले. त्यानुसार तीन टप्प्यात पाच हजारांप्रमाणे रोपे खरेदी करुन लागवड केल्याचा अहवाल देण्यात आला. मात्र, तेवढी वृक्ष लागवड झाल्याबाबत संशय आल्याने तो विषय सभागृहासमोर मांडला. सभागृहातील निर्णयानुसार ही झाडे कुठे लावली आणि त्यातील किती झाडे जिवंत आहेत, याच्या चौकशीसाठी महापालिका आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्‍त झाली. त्यामध्ये नगरअभियंता, मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखापाल यांचाही समावेश होता. त्यानंतर उद्यान विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी श्रीकांत म्याकलवार यांनी या प्रकाराची माहिती घेऊन समितीसमोर ठेवणे अपेक्षित होते. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याने सुमारे 38 लाखांच्या भ्रष्टाचाराबाबत संशय अधिक बळावल्याची चर्चा आहे.

 

संबंधित विभागाकडून काहीच निरोप
सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार नोव्हेंबर 2019 मध्ये आठ हजार वृक्ष लागवडीची चौकशी करण्यासाठी आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्‍त झाली. मात्र, संबंधित विभागाकडून काहीच कार्यवाही झालेली नाही. उद्यान विभागाशी संबंधित तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतेही पत्र तथा बैठकीसाठी पत्र दिले नाही. 
- संदीप कारंजे, नगरअभियंता, सोलापूर महापालिका

महापालिकेची आज सर्वसाधारण सभा
लॉकडाउननंतर प्रथमच महापालिकेची सर्वसाधारण सभा उद्या (सोमवारी) महापालिकेच्या सभागृहात होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या सभांमध्ये नगरसेवकांच्या बोलण्यावर मर्यादा होत्या. मात्र, आता विरोधी नगरसेवकांना विविध विषयांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरता येणार आहे. दरम्यान, नगरसचिवांची उचलबांगडी, नगरोत्थान योजनेच्या निधी वाटपातील असमानता, स्वच्छता व आरोग्य उपविधी कराची अंमलबजावणी आणि वृक्ष लागवडीतील घोटाळ्यावर रणकंदन होणार आहे. परंतु, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे ही सभा तहकूब होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्‍त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leave the trees, there are no pits in the place where they are planted