दुर्घटनेच्या राजकारणात अफवेचा बिबट्या पसार 

अरविंद मोटे 
Tuesday, 2 February 2021

घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता अतिउत्साहीपणाने एका दुर्घटनेच राजकारण करण्याच्या नादात सर्वत्र अफवा पसरली. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. मजूर कामाला येत नाहीत. ऊस तोड कामगार अडवून शेतकऱ्यांना "दक्षिणा' वाढवून मागत आहेत. याचा विचार कोण करणार. विशेष म्हणजे एका मुलाचा बळी जाऊनही वनखात्याने ना बिबट्या शोधला, ना तो वन्यप्राणी. पोलिस खात्यानेही या प्रश्‍नाला पद्धतशीरपणे बगल देत वन खात्यावर प्रकरण सोपवले.

सोलापूर :  वाळूज ( ता. मोहोळ) या ठिकाणी 26 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान वन्य श्‍वापदाच्या हल्ल्यात अनिकेत अमोल खरात (वय 10) या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक पातळीवर राजकारणाला इतका ऊत आला, की चक्क जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेची क्‍लिप व्हायरल झाली. या क्‍लिपमध्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी बिबट्या पाहिल्याची खोटीच माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. यामुळे विनाकारण अफवांचे पीक परिसरात आले. या अफवांमुळे मजुरांनी शेतात कामाला जाणे सोडले, ऊसतोड मजूर परत जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाली. 

या दुर्घटनेतील खरात परिवाराशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असल्याने जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुशांत कादे व पंचायत समितीच्या सभापती रत्नमाला पोतदार यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्या वस्तीला ना रस्ता ना पायवाट. द्राक्ष बागा, ज्वारीची शेते तुडवत सभापती बाईंनी दुचाकीवरून घटनास्थळ गाठले. ही कौतुकास्पद बाब. यात मालकांचे काही कार्यकर्ते कामाला लागले. या ठिकाणी कोणी कसा फोन केला. कोणी कसे अधिकाऱ्यांना कामाला लावले. त्यावर बराच खल झाला. या प्रकरणाची गावभर बरीच चर्चा झाली. काहींनी तर आपण "आण्णां'ना सांगून दरेकर साहेबांना फोन लावल्याने सूत्रे हलली, असेही ठोकून देण्यास सुरवात केली. मागील चार दिवसात परिसरातील सर्व राजकीय मंडळीनी सात्वंनपर भेटीसाठी त्या मुलांच्या घरी रीघ लावली आहे. 

यात मालकांचे काही कार्यकर्ते कामाला लागले आहेत, हे दिसताच सर्व पक्ष, गट, तट जागे होऊन पुढे सरले. या सर्वांवर कडी केली, ती म्हणजे नरखेडकर उमेश दादा यांच्या कार्यकर्त्यांनी. सर्वपक्षीय श्रेयवाद सुरू झाल्यानंतर आता त्यांचे कार्यकर्ते गप्प बसतील तर ते कसले कार्यकर्ते. त्यातील सोपान शिंदे नावाच्या कार्यकर्त्याने चक्क बापू घाडगे नावाच्या शेतकऱ्यांने बिबट्या पाहिला असल्याचे छातीठोकपणे उमेश पाटील यांना सांगितले. उत्साहाच्या भरात उमेश पाटील यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना कॉन्फरन्सवर घेतले. माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांने स्वतःच्या डोळ्याने बिबट्या पाहिल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर या संभाषणाची क्‍लिपही समाज माध्यमातून व्हायरल केली. हे संभाषण समाज माध्यमातून सर्वत्र व्हायरल होताच अफवांना इतका ऊत आला. चक्क एका बाईने कोल्हा पाहून "बिबट्या आला बिबट्या आला' असा आराडाओरडा केला. शेवटी वनखात्याला तिथे जाऊन बिबट्या नसल्याचे पटवून द्यावे लागले. 

घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता अतिउत्साहीपणाने एका दुर्घटनेच राजकारण करण्याच्या नादात सर्वत्र अफवा पसरली. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. मजूर कामाला येत नाहीत. ऊस तोड कामगार अडवून शेतकऱ्यांना "दक्षिणा' वाढवून मागत आहेत. याचा विचार कोण करणार. विशेष म्हणजे एका मुलाचा बळी जाऊनही वनखात्याने ना बिबट्या शोधला, ना तो वन्यप्राणी. पोलिस खात्यानेही या प्रश्‍नाला पद्धतशीरपणे बगल देत वन खात्यावर प्रकरण सोपवले. ना इतर कुठल्या शक्‍याशक्‍यतेचा तपास घेतला, ना वन्य प्राण्याची ओळख पटवली ना तो कुठे गेला याचा तपसा घेतला. कोणत्याही घटनेचे राजकारण करणे हे वाईटच. अखेर दुर्घटनेच्या या राजकरणात अफवेचा बिबट्या मात्र पसार झाला. संबधीत वस्तीवर रुग्णवाहिका दाखल होण्यापुरता तरी रस्ता असता तर या मुलाचा जीव कदाचित वाचला असता, असा विचार मात्र कुणालाही सुचला नाही. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The leopard spreads rumors in the politics of tragedy