आषाढी पालखी सोहळा रद्द ही केवळ अफवा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

रामभाऊ चोपदार यांनी सांगितले, की सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रभाव आहे. याचा फटका फक्त वारकऱ्यांना बसला आहे, असे नाही तर सर्वधर्मीयांना बसला आहे. गुढीपाडवा, हनुमान जयंती, रामनवमी, डॉ. आंबेडकर जयंती, ईद आदी सर्व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे न होता घरगुती प्रमाणात साजरे होत आहेत.

नातेपुते (सोलापूर) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज, जगद्‌गुरू तुकाराम महाराज व इतर संतांचे पालखी सोहळे रद्द करण्यात आल्याच्या चुकीच्या पोस्ट सोशल मीडियात फिरत आहेत. या केवळ अफवा आहेत. अशा प्रकारचा कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे वंशपरंपरागत चोपदार रामभाऊ चोपदार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 

रामभाऊ चोपदार यांनी सांगितले, की सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रभाव आहे. याचा फटका फक्त वारकऱ्यांना बसला आहे, असे नाही तर सर्वधर्मीयांना बसला आहे. गुढीपाडवा, हनुमान जयंती, रामनवमी, डॉ. आंबेडकर जयंती, ईद आदी सर्व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे न होता घरगुती प्रमाणात साजरे होत आहेत. मंदिरांमधून सर्व धार्मिक विधी होत आहेत. पंढरपूरची चैत्री वारी रद्द झाली नाही. स्थानिक फडकऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सेवा पूर्ण केल्या आहेत. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताबाई महाराज या सहा मानांच्या पालख्या व इतर शेकडो पालख्या पंढरपूरला येतात. लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर प्रशासन, पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक, मानकरी यांच्यासोबत बैठक घेऊन सामुदायिक निर्णय घेतला जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव किती व कधी कमी होईल तेव्हा मुख्य निर्णय होईल. अजून दोन महिने अवकाश आहे. सर्व पालख्यांचा निर्णय एकत्रित घेतला जाईल. पालखी सोहळा रद्द न करता साध्या स्वरूपात कसा करायचा याचा निर्णय प्रशासन व व्यवस्थापक घेतील. सध्यातरी पालखी सोहळा रद्द करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रातील जनतेने अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन रामभाऊ चोपदार यांनी केले आहे. 

समाजास पूरक असाच निर्णय
वारकरी संप्रदाय हा अडेलतट्टू नाही. शासन व समाजास पूरक असाच निर्णय सर्वांच्या विचारविनिमयातून घेतला जाईल. 
- रामभाऊ चोपदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let us take proper decision regarding Ashadi Vari of Pandharpur