राज्यपालसाहेब, जसं कंगना, शर्माबद्दल तुम्हाला वाईट वाटलं, तसं माझ्याविषयीही वाईट वाटू द्या! भेटीसाठी सोलापूरच्या शेतकऱ्याचे पत्र

श्रीनिवास दुध्याल 
Thursday, 17 September 2020

सौंदरे (ता. बार्शी) येथील युवा शेतकरी वीरेश आंधळकर यांनी राज्यपालांना ई-मेलवरून शेतकऱ्यांसमोरील अडचणी मांडल्या आहेत. तसेच सविस्तर चर्चा करण्यासाठी भेटीची वेळही मागितली आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिला भेटीसाठी वेळ देणारे राज्यपाल कोश्‍यारी हे शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी वीरेश आंधळकरला वेळ देतील का, याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. 

सोलापूर : केंद्र सरकारने पूर्वसूचना न देता कांदा निर्यातबंदी केल्याने कोरोना महामारीच्या संकटात भरडला जाणाला कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे. देशभरात केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात येत आहे. मोठ्या नुकसानीस शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार असल्यामुळे सोलापुरातील एका युवा शेतकऱ्याने थेट राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना ई-मेल करून शेतकऱ्यांची कैफियत मांडली आहे. 

सौंदरे (ता. बार्शी) येथील युवा शेतकरी वीरेश आंधळकर यांनी राज्यपालांना ई-मेलवरून शेतकऱ्यांसमोरील अडचणी मांडल्या आहेत. तसेच सविस्तर चर्चा करण्यासाठी भेटीची वेळही मागितली आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिला भेटीसाठी वेळ देणारे राज्यपाल कोश्‍यारी हे शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी वीरेश आंधळकरला वेळ देतील का, याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. 

वीरेश आंधळकरने राज्यपालांना केलेला ई-मेल... 

मा. श्री. भगतसिंह कोश्‍यारी 
महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य 

विषय : केंद्र सरकारकडून घालण्यात आलेल्या कांदा निर्यात बंदीसंदर्भात तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या इतर समस्यांसंदर्भात आपणास भेटणेबाबत 

महोदय, 

मी वीरेश आंधळकर, रा. सौंदरे, ता. बार्शी, जि. सोलापूर. मी एक पदवीधर असून माझी वडिलोपार्जित शेती आहे. कोरोना आणि लॉकडाउनच्या संकटामध्ये गावी परतावे लागले आहे. ही केवळ माझी एकट्याची परिस्थिती नसून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शहरामध्ये काम करणारी शिकणारी मुले आता गावाकडे परतलेली आहेत. 

बेभरवशाचं नैसर्गिक हवामान आणि यामध्ये शेतात काही पिकलं तरी बाजारामध्ये होणारी आमच्या शेतमालाची साठमारी पाहता आमच्या आईवडिलांनी आम्हाला चांगले शिकवून शहरामध्ये नोकरीसाठी पाठवले. शेती करण्याची इच्छा असतानाही आम्हाला शहरात काम करावं लागतं. परंतु वैश्विक महामारीमुळे आता गावी परतावे लागले. त्यामुळे वडिलोपार्जित शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी काम करून उत्पन्न काढण्यासाठी जिवाचे रान केलं आहे. यंदा निसर्गाने देखील साथ दिलीय मात्र त्यातच अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी यंदा मेटाकुटीला आलेला आहे. जास्त पावसामुळे रोपांवर रोग पडले तीन ते चार हजार रुपये किलोने घेतलेले कांदा बियाणे यामुळे खराब झाले. त्यातून काही वाचलेल्या रोपांची लागण केली तर आता केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लादली. त्यामुळे कांद्याचे भाव गडगडणार यात शंका नाही. 

उत्पादन खर्च एकरी 35-40 हजारांच्यावर जात असताना भाव मात्र किरकोळ मिळणार असल्याने खर्चही निघणार नाही. शेतीमध्ये विजेच्या वेळा रात्री-अपरात्री असतात, त्यामुळे जिवावर उदार होऊन अंधारामध्ये पिकांना पाणी द्यावे लागते. रोगांमुळे हजारोंची औषधे फवारणी, खते टाकावी लागतात. अशामध्ये शेतकरी आणि शेतीबद्दलचे निर्णय घेताना सरकार दरबारी आमची दखल घेतलीच जात नाही. हीच परिस्थिती राहणार असेल तर कष्टकरी शेतकऱ्यांची पोरं बंडखोर बनल्यास त्याला जबाबदार शासकीय यंत्रणा आणि राज्यकर्ते असणार आहेत. 

आपण संपूर्ण राज्याचा आधार आहात. आजवर अनेक राजकारणी, सिनेकलाकारांनी आपली भेट घेतल्यानंतर त्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. नैसर्गिक आणि सरकारी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपणच आता आधार होऊ शकता. तरी वरील सर्व परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आपली भेट मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तरी कृपया इतरांप्रमाणे आपण आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना देखील भेटण्यास वेळ द्यावा, ही हात जोडून विनंती. 

कळावे, 
आपल्या राज्यातील एक शेतकरी पुत्र 
वीरेश आंधळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A letter was given to the Governor by a young farmer from Solapur on the ban on onion exports