
खत वाटपासाठी शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी 21 कृषी सेवा केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे. 15 दुकानांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. या कारवाईनंतरही या दुकानांनी पुढील काळात या कुचराई केल्यास या दुकानांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.
- रविंद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
सोलापूर : खत वाटपासाठी शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीची अंमलबजावणी न करता ठराविक शेतकऱ्यांना प्रमाणापेक्षा जास्त खत विक्री करणे, खत विक्री करताना एकाच आधारकार्डवर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खताचे वाटप करणे यासह सह शासनाने ठरवून दिलेल्या खत वितरण व्यवस्थापनात कुचराई केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील 21 कृषी सेवा केंद्राचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. 15 कृषी सेवा केंद्र चालकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. खरिपातील खत वाटपात कृषी केंद्र चालकांनी ही कुचराई केली होती.
परवाना निलंबित केलेल्या कृषी सेवा केंद्रामध्ये पंढरपूर तालुक्यातील इंडिया कृषी केंद्र, सोहम कृषी केंद्र, पांडुरंग कृषी सेवा केंद्र, कट्टे ट्रेडिंग कंपनी, आपला ग्रोमर सेंटर, विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र, गुरुदत्त कृषी उद्योग समूह, माढा तालुक्यातील शिवराज कृषी केंद्र, माळशिरस तालुक्यातील रणजीत कृषी सेवा केंद्र, विशाल कृषी सेवा केंद्र, नेमचंद फुलचंद कडे कृषी सेवा केंद्र, पिलीव विकास कार्यकारी सोसायटीचे कृषी सेवा केंद्र, शेतकरी कृषी सेवा केंद्र, महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, धायगुडे ऍग्रो एजन्सी, मंगळवेढा तालुक्यातील समृद्धी कृषी केंद्र, कट्टे अग्रो एजन्सी, श्री महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, उत्तर सोलापूर तालुक्यातील वैशाली कृषी केंद्र, करमाळा तालुक्यातील एस. डी. दाभोडा कृषी सेवा केंद्र, दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्री गणेश कृषी सेवा केंद्र यांचा समावेश आहे. या कृषी सेवा केंद्रा विरोधात दाखल झालेल्या तक्रारींवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत 21 दुकानांचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.