... तर सोलापुरातील खासगी रुग्णालयांचे परवाने रद्द (VIDEO)

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 23 मे 2020

शहरातील नामवंत डॉक्‍टर आणि रुग्णालये कोरोनावर मात करायच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत. सर्वच खासगी रुग्णालयांत उपचार होणार आहेत. एखाद्या रुग्णालयात उपचारासाठी आवश्‍यक सुविधा नसेल तर त्याची कल्पना रुग्णास देण्याची सूचना केली आहे. तसेच रुग्णांनीही अडचणी समजून घेऊन सहकार्य करावे. 
- डॉ. हरीश रायचूर, अध्यक्ष, इंडियन मेडीकल असोशिएशन, सोलापूर शाखा 

सोलापूर : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुळे हॉस्पिटलमध्ये कोविड केअर केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख खासगी रुग्णांलयातही ठराविक संख्येने कोरोना रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्यात येणार आहेत. मुळे हॉस्पिटलमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, उपचार करण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले. 

सोलापूर प्रशासन व खासगी हॉस्पिटल चालक यांच्यातील विसंवाद दूर करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए), सोलापूर व सोलापूर प्रशासन यांना एकत्रित घेऊन ही बैठक आयोजिली. महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. हरीश रायचूर, डॉ. आरकल, डॉ. शिवपूजे, डॉ. घुली, डॉ. परळे व डॉ. कुलकर्णी, नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासह शहरातील प्रमुख रुग्णालयाचे चालक उपस्थित होते. 

खासगी डॉक्‍टरांना येणाऱ्या अडचणींबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच या मोहिमेत त्यांचे योगदान काय असेल याबाबतही चर्चा झाली. सोलापूर शहरातील आश्विनी सहकारी रुग्णालय, श्री मार्कंडेय रुग्णालय, यशोधरा रुग्णालय यांनीही कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची पूर्णत: तयारी दर्शविली आहे. महापालिका व इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने शहरामध्ये स्पेशल कोविड केअर हॉस्पिटल उभारणीकरीता चर्चा केली. प्रायोगिक तत्वार धनराज गिरजी मुळे हॉस्पिटल येथे आवश्‍यक त्या बाबी, साधनसामग्री व सोयी-सुविधांचा आढावा घेऊन 50 बेडस्‌ चे अतिदक्षता विभाग (आयसीयु) असणारे सुसज्ज असे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करावे, असे आयुक्तांना सुचविण्यात आले आहे. 

होम मैदान किंवा नॉर्थकोट मौदान येथे 500 ते 1000 बेडसचे सर्व सोयी सुविधायुक्त सुसज्ज असे आयसोलेशन युनिट हे राज्य सरकार व महापालिका यांच्या माध्यमातून तत्काळ उभारणी करण्याचेही सुतोवाच आमदार शिंदे यांनी यावेळी केले. 

सोलापूर शहरातील गर्भवती महिलांनी प्रसुती, इतर उपचार व तपासणीसाठी महापालिकेच्या प्रसुतीगृहांमध्ये करुन घ्यावी. 
सोलापूर शहरातील ज्या हॉस्पिटल्सना महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नोंदणी करायची आहे व ज्या हॉस्पिटल्सने नोंदणीकरीता अर्ज दाखल केले आहे, त्यांनी संपर्क साधावा. 
- प्रणिती शिंदे, आमदार 

सर्व खासगी रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार करण्याची तयारी दर्शविली आहे. ज्या रुग्णालयांत उपचार करण्यास टाळाटाळ होईल, त्याची लेखी तक्रार आली तर संबंधित रुग्णालय सील करण्यात येईल. तसेच संबंधितांवर नर्सिंग होम कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल व त्याचा परवाना रद्द केला जाईल. 
- दीपक तावरे, आयुक्त 

... तर सोलापुरातील खासगी रुग्णालयांचे परवाने रद्द (VIDEO)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Licenses of private hospitals in Solapur will be revoked by municipal commishnor