esakal | लिंगायत समाज कॉंग्रेससोबत आलाच नाही, प्रभारी शहराध्यक्ष वाले यांना हटविण्याची मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

logo

कॉंग्रेसमध्ये बदलाच्या हालचाली 
महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाचे संकेत कॉंग्रेसचे नवे प्रभारी हनुमंत गौडा कृष्णेगौडा ऊर्फ एच. के. पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे येत्या काळात कॉंग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. सोलापूर शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी संजय हेमगड्डी, राजन कामत, सुनील रसाळे, मनीष गडदे, आसिफ नदाफ, केशव पिंगळे, देवेंद्र भंडारी, अरुण शर्मा यांची नावे चर्चेत आहेत. 

लिंगायत समाज कॉंग्रेससोबत आलाच नाही, प्रभारी शहराध्यक्ष वाले यांना हटविण्याची मागणी 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहर कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी प्रकाश वाले यांची नियुक्ती करून 4 ऑक्‍टोबरला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्या उद्देशासाठी वाले यांची नियुक्ती केली. ते दोन्ही उद्देश असफल झाल्याचा दावा करत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाले यांना हटवून कॉंग्रेसमधील ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला शहराध्यक्षपदाची संधी द्यावी, अशी मागणी माजी सभापती सुनील रसाळे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना दिले आहे. 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लिंगायत मतांचा फायदा कॉंग्रेसला होईल यासाठी वाले यांची नियुक्ती झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शहराचे प्रभारी अध्यक्ष प्रकाश वाले हे स्वतःच्या बुथवर कॉंग्रेसला मताधिक्‍य देऊ शकले नसल्याचा आरोपही रसाळे यांनी या पत्रात केला आहे. महापालिकेत कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी अध्यक्ष बदल अपेक्षित आहे.

प्रभारी अध्यक्ष कोणताही कार्यक्रम घेत नाहीत. एनएसयूआय व युवक कॉंग्रेसच्या कार्यक्रमात प्रभारी अध्यक्ष हजेरी लावतात आणि तोच रिपोर्ट प्रदेश कॉंग्रेसला पाठवतात असा आरोपही रसाळे यांनी केला आहे. शहर कॉंग्रेसच्या कुठल्याही जेष्ठ पदाधिकाऱ्यांना ते बोलवत नाही. त्यांच्याशी चर्चा करत नाहीत. महापालिकेची निवडणूक जवळ आली असतानाही कोणत्याच प्रकारच्या बूथ कमिट्या, वॉर्ड कमिट्या, केलेल्या नाहीत असेही रसाळे यांनी या पत्रात म्हटले आहे.