अवैध व्यवसायाशी संबंधित 155 पोलिसांची यादी झाली तयार ! अडीच महिन्यांच्या प्रशिक्षणाची पहिली शिक्षा

तात्या लांडगे 
Tuesday, 2 March 2021

ग्रामीण भागातील गुन्हेगारी कमी करून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या हेतूने पोलिसांचे काम पारदर्शकपणे चालायला हवे. मात्र, मोजक्‍या कर्मचाऱ्यांमुळे बदनाम होणारी पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी अवैध व्यवसायाशी संबंधित काही कर्मचाऱ्यांची यादी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तयार केली आहे. 

सोलापूर : अवैध व्यवसाय करणाऱ्यांशी मैत्रिपूर्ण संबंध, अवैध व्यवसायात भागीदारी अथवा स्वत:चाच अवैध व्यवसाय असलेल्यांसह पोलिस कारवाईची माहिती देणे, हप्ते वसूल करणे, दोन गटांत संघर्ष होईल असे कृत्य करणे, पोलिसांत दाखल गुन्ह्यांची माहिती बाहेर कोणाला तरी देणे, अशा विविध गोष्टींमधील 231 ग्रामीण पोलिसांची यादी तयार झाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 33 कर्मचाऱ्यांना सव्वादोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. आता 43 जणांचे प्रशिक्षण सुरू असून आणखी 155 जणांची यादी तयार केल्याची चर्चा आहे. 

ग्रामीण भागातील गुन्हेगारी कमी करून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या हेतूने पोलिसांचे काम पारदर्शकपणे चालायला हवे. मात्र, मोजक्‍या कर्मचाऱ्यांमुळे बदनाम होणारी पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी अवैध व्यवसायाशी संबंधित काही कर्मचाऱ्यांची यादी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तयार केली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील 25 पोलिस ठाण्यांना भेटी देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना सक्‍त सूचना केल्या आहेत. तक्रार देण्यासाठी आलेल्यांकडून काहीच अपेक्षा न करता त्यांचे काम व्हायला हवे. अवैध व्यवसायात भागीदारी नको, तशा कोणत्याही व्यक्‍तींसोबत कोणत्याही कर्मचाऱ्यांचे संबंध नसावेत, अशा सूचनांचा त्यात समावेश होता. तरीही अवैध व्यवसायाशी संबंधित असलेल्या संशयितांना सुधारण्याची एक संधी म्हणून त्यांना पोलिस मुख्यालयात प्रशिक्षण दिले जात आहे. "वाल्याचा वाल्मीकी झाला' या तत्त्वानुसार त्यांच्यात सुधारणा न झाल्यास संबंधितांना थेट घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. 

"त्या' कर्मचाऱ्यांवरील ठपका... 

  • पोलिसांची कारवाई होण्यापूर्वीच संबंधिताला माहिती पुरविणे 
  • अवैध व्यवसाय सुरू असतानाही हप्ते घेऊन त्याला अभय देणे 
  • दोन गटांत वाद निर्माण करून अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करणे 
  • पोलिसांत दाखल होत असलेल्या गुन्ह्यांची माहिती कोणाला तरी देऊन गोपनीयतेचा भंग करणे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A list of police officers involved in illegal business has been prepared and they will be given training punishment