कोरोना : ...सांगा आमची पोटं गप्प बसणार का?

Vidi Kamgar
Vidi Kamgar

सोलापूर : संप असो, बंद असो अथवा दंगली, त्या प्रत्येकवेळी कामगारांचे काम बंद झाल्याने प्रत्येक वेळी नुकसान भरपाई मिळालीच नाही. आम्ही काम करतो म्हणून मालकांचे कारखाने सुरू आहेत. आता आमच्या नुकसानीत त्यांनी स्वत:हून मदत करायला हवी. सरकारनेही आमची कामे बंद करून आम्हाला घरात बसवताना, आमची अन्नधान्याविना, पैशाविना उपासमार घडेल, याचा विचार करायला हवा होता. आम्हाला घरी बसवलात म्हणजे आमची पोटं गप्प बसणार का, असा सवाल विडी, यंत्रमाग व रेडिमेड शिलाई कामगारांनी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी व मालकांना केला.

सर्व स्तरांतून व्हाव्यात उपाययोजना
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे शहरातील सर्व कामगारांचा रोजगार 22 मार्चपासून बुडाला आहे. विडी कामगारांच्या बॅंक खात्यावर मालकांनी जितके दिवस काम केले तितक्‍या दिवसांची मजुरी टाकली आहे. मात्र कामगारांची 22 मार्चपासूनची सुरू असलेली उपासमार दहा-पंधरा दिवसांच्या मजुरीने थांबणार नाही. तसेच सरकारने फक्त जन-धन खात्यावरच 500 रुपये जमा केले मात्र जन-धन खाते नसलेल्या गरिबांसाठी काय? रेशन दुकानातून धान्याचे वितरण इमानदारीने होत नाही, त्याकडे कोणी लक्ष देईल का? यासाठी सर्व स्तरांतून कामगारांच्या हिताचे निर्णय व उपाययोजना व्हायला हव्यात, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केल्या.

गेल्या 18 वर्षांपासून विडीकाम करीत आहे. एवढ्या वर्षांत चार वर्षांपूर्वी एक महिना विडी मालकांच्या संपामुळे बेरोजगार झालो होतो आता पुन्हा सरकारने कारखाने बंद करायला सांगितले. प्रत्येक वेळी आम्हा कामगारांचेच नुकसान झाले आहे. मुलगा शिलाई कामगार असून तोही घरीच आहे. भाड्याचे घर आहे. भाडे कसे द्यायचे, खायचे काय अन्‌ जगायचे कसे असा प्रश्‍न आमच्यासमोर आहे.
- इंदिरा शेरला, चाकोतेनगर, जुने विडी घरकुल

घरात दोन लहान मुले आहेत. मी विडी कामगार व पती शिलाई कामगार आहेत. भाड्याच्या घरात राहतो. आता दोघेही बेरोजगार झालो आहोत. घरात धान्य नाही. दहा दिवसांची मजुरी मिळाली. मालक एक हजार रुपये ऍडव्हान्स देणार म्हणतात मात्र ती रक्कम पगारातून कापून घेणार आहेत. महिनाभराचे नुकसान भरून काढले तरच आम्हाला आधार मिळणार आहे.
- राधिका ताटीपामूल, चाकोतेनगर

पती अपंग असूनही परिस्थिती बरी नसल्याने रेडिमेड शिलाईकाम करतात. मी विडी कामगार असून माझ्यासह तेही घरीच बसून आहेत. लहान मुले आहेत. घरात धान्य शिल्लक राहिले नाही. परवा पाच-पाच किलो धान्य मिळाले तेही पैसे देऊन. ते आठवडाभरही पुरणार नाही. खरं म्हणजे सरसकट गरिबांना मोफत धान्य मिळायला हवे. प्रत्येकाच्या खात्यावर रक्कम जमा करावी.
- अंबिका द्यावरकोंडा, चाकोतेनगर

मी शिलाई कामगार आहे. पत्नी विडी कामगार आहे. सध्या आम्ही दोघेही बेरोजगार झालो आहोत. सरकार गरिबांच्या जन-धन खात्यात 500 रुपये जमा करीत आहे. मात्र ज्यांच्याकडे जन-धन खाते नाही, त्या गरिबांचं काय? रेशन कार्ड नाही, मग आम्हाला धान्य कोण देणार? रोज भाजीपाल्याला 50 रुपये लागतात. महागाई वाढली. शासनाने आमच्या परिस्थितीचाही विचार करावा.
- व्यंकटेश कोडूर, चाकोतेनगर

मी विडी कामगार आहे. पती लूम कामगार होते मात्र तीन वर्षांपासून आजारी आहे. दोन मुले आहेत. सासरे आहेत मात्र ते वृद्ध आहेत. मी काम केले तरच घर चालते. विडी कारखाने बंद असल्याने मजुरी बंद झाली आहे. रेशनमधून सध्या पैसे देऊन धान्य घेतले. ते किती दिवस पुरणार. सामाजिक संस्थांची मदत आमच्यापर्यंत पोचत नाही. शासनाने बंद काळातील संपूर्ण मजुरी द्यावी.
- शारदा म्हंता, चाकोतेनगर

मी विडी कामगार आहे. पती घडीखाता काम करतात. सध्या आम्ही बेकार आहोत. दोन मुले आजारी आहेत. माझे वडील गेल्या महिन्यात वारल्याने माझी आई सध्या माझ्याकडे आहे. घरात खायला अन्न नाही. धान्य वाटप होत असते मात्र आमच्यापर्यंत कोणी आणून देत नाही. चांगल्या घरच्यांपर्यंतच अन्नधान्याचे वाटप होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही काय खावे? मदत करणाऱ्यांनी खरोखरच गरजूंना मदत करावी.
- अंबिका ताला, ब्रह्मनाथनगर, जुने विडी घरकुल

मी विडी कामगार आहे. पती तीन वर्षांपासून लकवा मारल्याने घरातच आहेत. सासूही वृद्धापकाळाने थकली आहे. मुलगा हॉटेलात कामाला जात होता. आता तोही बेकार झाला आहे. आता काम नाही, मजुरी नाही व घरात धान्यही संपले आहे. रेशन दुकानात 15 तारखेनंतर बोलावत आहेत, तेही फोन करून या, असे सांगितले जाते. तोपर्यंत आम्ही काय खायचे?
- निर्मला येमूल, विडी घरकुल

मी विडी कामगार आहे. आम्हाला कोणी मदत करत नाहीत. मालकांनी आम्हाला निदान निम्मा पगार तरी दिला पाहिजे. घरात बसलो म्हणजे पोट गप्प बसत नाही. भूक तर शमवावीच लागते. मात्र घरात अन्नधान्य शिल्लक नाही. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना विषाणू रोखण्यासाठी लॉकडाउनचा चांगला निर्णय घेतला. त्याप्रमाणे गरिबांचाही त्यांनी विचार करून त्यांच्या गरजा भागवाव्यात.
- रेणुका गुंडला, भगवाननगर वसाहत

कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले, मात्र यात जे गरीब कामगार आहेत, ज्यांना काम केल्याशिवाय रोजचे जेवण मिळत नाही, अशांची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. केंद्र व राज्य सरकारने कामगारांकडे रेशन कार्ड असो अथवा नसो सर्वांना पाच रुपयांप्रमाणे 35 किलो धान्य द्यायला हवे. विडी कामगारांना निदान अर्धा पगार द्यायला हवा. कामगारांना सर्व सुविधा द्या.
- नसीमा पठाण, प्रदेशाध्यक्षा, सीटू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com