लॉकडाउनच्या चक्रव्यूहात आठवडे बाजार; ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प, छोटे व्यावसायिक संकटात 

राजाराम माने 
Tuesday, 22 September 2020

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव शहरासह आता ग्रामीण भागातही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच ग्रामीण भागातील आठवडे बाजार गेल्या सात महिन्यांपासून बंद आहेत. एकूणच आठवडे बाजारातील होणारी मोठी उलाढाल यामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे आठवडा बाजारात व्यवसाय करणाऱ्या छोट्या-छोट्या व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव शहरासह आता ग्रामीण भागातही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच ग्रामीण भागातील आठवडे बाजार गेल्या सात महिन्यांपासून बंद आहेत. एकूणच आठवडे बाजारातील होणारी मोठी उलाढाल यामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे आठवडा बाजारात व्यवसाय करणाऱ्या छोट्या-छोट्या व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आठवडे बाजार शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. त्या बाजारांची उलाढालही मोठ्या प्रमाणात होत असते. काही ठिकाणच्या आठवडे बाजारांना अनेक वर्षांची परंपराही आहे. काही ठिकाणी ग्रामीण भागात नव्याने आठवडे बाजार सुरू झाले आहेत. या आठवडे बाजारात फळे, भाजीपाला, शेती अवजारे, खेळणी, कपडे, किराणा, भांडी, भेळ, शालेय साहित्य, मिठाईची दुकाने, चहा दुकाने, चप्पल, वडापाव आदींची दुकाने दाटीवाटीने सजवून छोटे व्यावसायिक व्यवसाय करतात. 

मात्र सात महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होत्याचे नव्हते केले व आठवडे बाजार बंद झाले. दैनंदिन व्यवसायाची घडी मात्र यामुळे विस्कटली गेली. त्यामुळे आर्थिक संकटात मात्र भरच पडली आहे. हा प्रश्न कसा आणि केव्हा सुटणार? हाच प्रश्न व्यावसायिकांसमोर आहे. महामारी कोरोनामुळे सुरू असलेल्या व वरचेवर वाढत असलेल्या लॉकडाउन व संचारबंदीचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसत आहे. परिणामी शहराबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चाकही रुतले आहे. ग्रामीण भागात भरणारे आठवडे बाजार बंद असल्याने आर्थिक चक्र थांबले व व्यवहार ठप्प झाले आहेत. आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने गावातील बाजारपेठेवर अवलंबून असते. आठवडा बाजारात शेजारील आसपासची दहा-बारा गावे तसेच वाड्या- वस्त्यांची वर्दळ होते. 

मध्यंतरी लॉकडाउनमध्ये (अनलॉक चार) थोडी शिथिलता दिल्याने शहरी भागातील सर्व व्यवहार जवळजवळ सुरू झाले आहेत. आता ग्रामीण भागातही व्यवहार सुरू व्हावेत यासाठी प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे. 

केत्तूरच्या गृहिणी रूपाली महामुनी म्हणाल्या, आठवडा बाजार बंद असल्याने भाजीपाला चढ्या भावाने खरेदी करावा लागत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The lockdown has led to the closure of weekly markets in rural areas