लॉक डाऊनमध्ये बोकाळू लागली खाजगी सावकारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी खासगी सावकारीकडे लोक वळू लागले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोलापूर : लॉक डाऊनच्या कालावधीत उद्योग, व्यवसाय, व्यापार ठप्प असल्याने भल्याभल्या व्यक्तींना आर्थिक चणचण भासू लागली आहे. आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी खासगी सावकारीकडे लोक वळू लागले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील खासगी सावकारीला आळा घालावा व सर्वसामान्य, कामगार, शेतकरी यांना बँकांमधून सहजपणे कर्ज पुरवठा व्हावा अशी मागणी सोलापुरातील श्रीनिवास केंची यांनी सहकार विभागाकडे केली आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉक डाऊन जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने सोलापूर शहर व ग्रामीण भागात संचारबंदी/जमावबंदी लागू करण्यात आली आहे.या सर्वाचा परिणाम राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्या कर्ज वाटपावर झाला आहे.

गेल्या दोन महिन्या पेक्षा अधिक काळापासून शहर व जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय बंद आहेत. सोलापूर हे कामगारांचे शहर आहे. यंत्रमाग, विडी उद्योगावर अवलंबून असलेले अनेक कामगार या शहरात आहेत. उद्योग व व्यवसाय बंद असल्याने मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, कामगार यांना पैशाची नितांत गरज आहे. बँकांमधून कर्ज स्वरूपात पैसे उपलब्ध होत नसल्याने अनेक जण खासगी सावकाराकडे वळले असल्याची माहिती आहे. अवाच्या सव्वा व्याजाची रक्कम आकारून खासगी सावकाराकडून कर्ज घेत आहेत. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतीच्या कामासाठी देखील ग्रामीण भागातील शेतकरी खासगी सावकाराकडे वळले आहेत. शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय, खासगी नोकरदार यांना सुलभपणे कर्जपुरवठा व्हावा. तसेच खासगी सावकारीवर आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

पतसंस्था फेडरेशनने दिला पर्याय
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील व्यक्तींनी खासगी सावकाराकडे जाऊ नये. ज्या व्यक्तींना कर्ज स्वरूपात आर्थिक मदतीची आवश्यकता आहे अशा व्यक्तींसाठी सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. ज्या व्यक्तींना कर्ज स्वरूपात रक्कम आवश्यक आहे त्या व्यक्तींनी 9370089777 या नंबरवर संपर्क साधावा. त्या व्यक्तींना त्यांच्या परिसरातील पतसंस्थेच्या माध्यमातून मदत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 
- दिलीप पतंगे, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In lockdown Private lending booms