esakal | लॉकडाउन वाढणार ! एमपीएससीची परीक्षा पुन्हा लांबणीवर
sakal

बोलून बातमी शोधा

mpsc_650_081614125408.jpg

ठळक मुद्दे... 

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलली 
  • 26 एप्रिल रोजी राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार होती 
  • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब, संयुक्‍त पूर्व परीक्षा होणार होती 10 मे रोजी 
  • कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक हिताचे आयोगाने पुढे केले कारण 
  • विद्यार्थ्यांना दिली जाणार एसएमएसद्वारे माहिती, अद्याप वेळापत्रक निश्‍चित नाही 

लॉकडाउन वाढणार ! एमपीएससीची परीक्षा पुन्हा लांबणीवर

sakal_logo
By
तात्या लांडगे
सोलापूर : कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेला लॉकडाउन वाढण्याची शक्‍यता आता दाट वाटू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंगळवारी (ता. 7) महत्त्वाचा निर्णय जाहीर करीत राज्यसेवेची पूर्व परीक्षा व महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढे कधी परीक्षा होणार हे स्पष्ट केलेले नाही.

हेही नक्‍की वाचा : सकाळ ब्रेकिंग ! जुलैनंतर सुरु होणार आगामी शैक्षणिक वर्ष 


कोरोनाच्या लॉकडाउनमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 22 मार्च रोजी राज्यसेवेची पूर्व परीक्षा 26 एप्रिलला तर महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा 10 मे रोजी घेण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, मागील काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यांमध्ये वाढू लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे कारण पुढे करीत आयोगाने हा निर्णय जाहीर केला. दरम्यान, क्‍लासेसच्या माध्यमातून एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अद्यापही पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत. त्यांना मागील काही दिवसांपासून रुम भाडे भरण्याची पंचाईत होऊ लागली असून घरमालकांनी त्यांच्याकडे भाड्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आता घरभाड्यासाठी शासनाने सवलत द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, त्याबाबत काहीच निर्णय न झाल्याने आणि आता परीक्षा लांबणीवर पडल्याने या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. 


हेही नक्‍की वाचा : ऐका हो ऐका ! कोरोनाला हद्दपार करण्यासाठी हे करा 


विद्यार्थ्यांना मिळणार एसएमएसद्वारे माहिती 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससीच्या राज्यसेवेची पूर्व परीक्षा व महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा रद्द केली आहे. आता नव्याने वेळापत्रक निश्‍चित केले जाणार असून त्याची मदार आता लॉकडाउन कधीपर्यंत चालवणार यावर असणार आहे. अद्याप लॉकडाउनबद्दल काहीच स्पष्ट झाले नसल्याने आयोगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. आयोगाकडून करण्यात आलेल्या बदलाची माहिती नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. 


हेही नक्‍की वाचा : मोठा निर्णय ! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच 

लॉकडाउनबद्दल काहीच समजत नसल्याने निर्णय 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा कालावधी वाढेल की 14 एप्रिलनंतर सुरळीत होईल, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवेची पूर्व परीक्षा व महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 
- राजेंद्र वाघ, अव्वर सचिव, एमपीएससी, मुंबई