लॉकडाउनमुळे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे तब्बल 17 कोटींचे नुकसान 

Loss of Rs 17 crore to Pandharpur Shri Vitthal Rukmini Mandir Samiti due to lockdown
Loss of Rs 17 crore to Pandharpur Shri Vitthal Rukmini Mandir Samiti due to lockdown

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीला मागील वर्षी 17 मार्च ते 31 ऑगस्ट या काळात 18 कोटी 85 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. मंदिरात येणाऱ्या भाविकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी यंदा 17 मार्चपासून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा समितीला या काळात केवळ 1 कोटी 41 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सुमारे 17 कोटी रुपयांचे उत्पन्न कमी मिळाले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी सकाळ शी बोलताना दिली. 

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असल्यामुळे सहाजिकच भाविकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या देणग्या आणि दानपेटीमध्ये टाकली जाणारी रक्कम थांबली आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका मंदिर समितीला बसला आहे. मंदिर भाविकांसाठी सुरू करावे अशी मागणी होत आहे. परंतु अद्याप शासनाकडून याविषयी निर्णय झालेला नाही. 

समितीने उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली तरी लॉकडाउन काळात मानवतावादी भूमिका व सामाजिक उत्तरदायित्व या भावनेतून अनेक कामांसाठी खर्च केला. लॉकडाउन काळात पंचावन्न दिवस निराधार आणि इतर राज्यातील सुमारे एक हजार पाचशे लोकांना दररोज दोन वेळा जेवण देण्याचा निर्णय घेऊन तशी व्यवस्था केली. त्यासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च झाला. मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपये देण्यात आले. पोलिस खात्यास लॉकडाउन काळात मदतीसाठी 50 कमांडो मंदिर समितीतर्फे दिले. त्यासाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च झाला. सीसीटीव्ही कॅमेरे नवीन बसवले त्यासाठी तीन लाख रुपये, कोरोनासाठी किट खरेदी, मास्क, बोर्ड, सॅनिटायझरसाठी 1 लाख 70 हजार रुपये, मंदिरात आवश्‍यक ठिकाणी वॉल फॅन आणि एलईडी बल्ब बसवण्यासाठी 1 लाख रुपये, मंदिराच्या वरील बाजूस एक्‍झॉस्ट फॅनसाठी दोन लाख पन्नास हजार, ध्वजस्तंभ बसवण्यासाठी एक लाख, श्री विठ्ठल मूर्तीस वज्रलेप करण्यासाठी बारा हजार, मंदिराच्या आतील बाजूचा रंग काढण्यासाठी 2 लाख 20 हजार, तालुक्‍यातील बार्डी येथील जनावरांना चारा व पाण्याच्या टॅंकरच्या व्यवस्थेसाठी 1 लाख 50 हजार, पंढरपूर मधील जनावरांच्या चाऱ्यासाठी 1 लाख 50 हजार, पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावरील झाडांना टॅंकरद्वारे पाणी देण्यासाठी 65 हजार रुपये, मंदिराचा डीपीआर तयार करण्यासाठी 12 लाख रुपये, तीन ऑक्‍सिजन मशीन साठी 8 लाख 46 हजार रुपये, श्री विष्णुपद मंदिर बंधारा देखभालीसाठी 2 लाख 42 हजार रुपये असा सुमारे 1 कोटी 73 लाख 5 हजार रुपये खर्च झाला. या शिवाय मंदिर कर्मचारी यांचे पगार आणि इतर अनुषंगिक खर्च सुमारे अडीच कोटी इतका झाला आहे. 
30 सप्टेंबरपर्यंत श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच दरम्यान येत्या 18 सप्टेंबर पासून अधिक मास सुरू होणार आहे. दरवर्षी अधिक मासामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे अधिक महिन्यात श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्यांमध्ये अनेक पटीने वाढ होत असते. यंदा अधिक महिन्याच्या काळात मंदिर बंदच राहिल्यास मंदिर समितीचे मोठे नुकसान होणार आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com