पंढरपूरच्या पूरबाधित क्षेत्रात बांधकाम ! "राष्ट्रवादी'च्या तक्रारीनंतर "पंतप्रधान आवास'च्या सोडतीस व बांधकामास स्थगिती

gharkul
gharkul

पंढरपूर (सोलापूर) : पंतप्रधान आवास योजनेतून पहिल्या टप्प्यात बांधण्यात आलेल्या 892 घरांची लॉटरी सोडत आज (ता. 26) काढण्यात येणार होती. परंतु या कामास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्थगिती दिलेली असल्याने ही सोडत स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पंढरपूर येथे सुमारे दोन हजार घरे बांधण्यात येणार आहेत. हे काम पूरबाधित क्षेत्रात केले जात असून बांधकामात अनेक त्रुटी आहेत, अशा आशयाच्या तक्रारी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी शासनाकडे केल्या आहेत. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेऊन त्यांनी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि ती होईपर्यंत कामास स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

दरम्यान, रविवारी आणि सोमवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे येऊन कामाची पाहणी केली. प्रांताधिकारी सचिन ढोले, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगरअभियंता नेताजी पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. गावडे, जलसंपदा विभागाचे श्री. मिसाळ हे या वेळी उपस्थित होते. 

पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, पंढरपूर येथे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून मोठे काम सुरू आहे. पूरबाधित क्षेत्रात या प्रकल्पाचे काम सुरू आहे. मागील वर्षी या ठिकाणी पुराचे पाणी आले होते. त्यामुळे या प्रकल्पाची जागा सुरक्षित नाही. त्याचबरोबर ब्लॅक कॉटन सॉईलवर बांधकाम केले जात आहे. त्यामुळे या बांधकामाचे फाउंडेशन योग्य दर्जाचे झालेले नाही, अशा आशयाची तक्रार तक्रारकर्त्यांची आहे. 

आज आपण जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली. ते जो अहवाल देतील त्या आधारावर आपण आपला अहवाल तयार करून शासनाकडे पाठवणार आहे, असे श्री. शंभरकर यांनी स्पष्ट केले. या योजनेच्या माध्यमातून एकूण 2 हजार 92 घरे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 892 घरांसाठी आज (मंगळवारी) सोडत काढण्यात येणार होती. त्या प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे. 

हा गरीब कुटुंबांवर अन्याय : सत्ताधाऱ्यांचा आरोप 
दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पंढरपूर नगरपरिषदेचे सत्ताधारी शहर विकास आघाडीचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, नगरसेवक अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, सुजितकुमार सर्वगोड, संजय निंबाळकर, विक्रम शिरसट, डी राज सर्वगोड, अमोल डोके, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा बागल यांनी भेटून म्हणणे मांडले. प्रकल्प आता पूर्णत्वास जात असताना व सर्वसामान्य गरीब कुटुंबांना आता या योजनेतून स्वतःची घरे मिळत असताना काही स्वार्थी पुढारी राजकारण आणून या योजनेस विरोध करीत आहेत. उद्या यातील 892 गरीब कुटुंबांना लकी ड्रॉद्वारे घरे मिळणार होती. पण केवळ आमदार प्रशांत परिचारक यांनी केंद्रातील भाजप सरकारकडून हा प्रकल्प मंजूर करून पूर्णत्वास आणला म्हणून याला विरोध होत असल्याचे सत्ताधारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. योजना थांबवून गरीब कुटुंबावर अन्याय केला जाणार असेल तर आम्ही 892 कुटुंबांसह उपोषण करू व शहर विकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढून त्यांना न्याय देऊ, असे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com