शिंदे समर्थकांच्या गटांमध्येच सामना ! माढा तालुक्‍यात साठे, सावंत समर्थक गटांनी वाढविली रंगत

किरण चव्हाण 
Wednesday, 13 January 2021

तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर सध्या भलताच शिगेला पोचला आहे. मात्र सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर निश्‍चित होणार असल्याने निवडणुकीतील रस्सीखेच थोडी कमी झाल्यासारखी वाटते. बिनविरोध निवडणूक करणाऱ्या गावांसाठी विकास निधीच्या आश्वासनानंतर तालुक्‍यातील निवडणूक लागलेल्या 82 पैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 74 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतीतील 59 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. 

माढा (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील 74 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराने गती घेतली असून, गावागावांत एकेका मताचा हिशेब मांडला जात आहे. कार्यकर्त्यांची धावपळही वेगात असून, पक्षीय पातळीपेक्षा गावांतील गटा-तटामध्येच लढती होत आहेत. 

तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर सध्या भलताच शिगेला पोचला आहे. मात्र सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर निश्‍चित होणार असल्याने निवडणुकीतील रस्सीखेच थोडी कमी झाल्यासारखी वाटते. बिनविरोध निवडणूक करणाऱ्या गावांसाठी विकास निधीच्या आश्वासनानंतर तालुक्‍यातील निवडणूक लागलेल्या 82 पैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 74 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतीतील 59 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक बिनविरोध होण्यासाठीही अनेक गावांत यंदा जोरदार चर्चा व बैठका झाल्या; मात्र प्रत्यक्षात बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या तशी कमीच आहे. सध्या माढा तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. 

तालुक्‍यातील अनेक गावांमधून आमदार बबनराव शिंदे समर्थकांचेच दोन-दोन, तीन-तीन गट असून त्यांच्यातच लढती होत असल्याचे चित्र आहे. माजी आमदार धनाजी साठे व शिवसेनेचे समन्वयक प्रा. शिवाजी सावंत समर्थकांचे गटही काही ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आमदार बबनराव शिंदे समर्थकांच्या गटा-तटामध्येच निवडणुकीचा सामना रंगलेला आहे. तालुक्‍यातील अंजनगाव उमाटेसह काही ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापितांना युवकांनी आव्हान दिले असून, अशा गावांतील निवडणुकीतील चुरस वाढलेली आहे. 

उंदरगाव ग्रामपंचायतीमध्ये यंदा तिरंगी सामना होत असून आमदार बबनराव शिंदे समर्थक असलेल्या अरविंद चव्हाण यांच्या गटाने यंदा माजी आमदार धनाजी साठे गटात प्रवेश करून आमदार शिंदे समर्थक अमोल चव्हाण व प्रा. सावंत समर्थक धनू मस्के गटाला आव्हान दिले आहे. उंदरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत संभाजी ब्रिगेड समर्थकही उतरले आहेत. माढा तालुक्‍यातील विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील बिनविरोधचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने येथे आमदार बबनराव शिंदे समर्थक मोहन कदम विरुद्ध प्रा. शिवाजी सावंत समर्थक हनुमंत जाधव यांच्या गटात सरळ लढत होत आहे. वाकाव ग्रामपंचायतीमध्ये प्रा. शिवाजी सावंत समर्थकांच्या ग्रामदैवत गुंडेश्वर विकास पॅनेल विरुद्ध आमदार शिंदे समर्थक असलेल्या माणकोजी भुसारे व भारत खंडागळे यांच्या बोधराज ग्रामीण विकास पॅनेलमध्ये लढत होत आहे. मोडनिंब ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढती होत असून, दोन वॉर्डात मात्र तिरंगी लढत होत आहे. 

ठळक... 

  • लक्षवेधी निवडणूक : मोडनिंब, कुर्डू, मानेगाव, उपळाई खुर्द, उपळाई बुद्रूक, लऊळ या ग्रामपंचायत निवडणुकीत लक्षवेधी लढती होत आहेत. 
  • रंगतदार निवडणुका : उंदरगाव, विठ्ठलवाडी, लऊळ, कुर्डू , मानेगाव, उपळाई खुर्द, उपळाई बुद्रूक , मोडनिंब, अंजनगाव (उमाटे) यासह काही गावांमध्ये रंगतदार लढती पाहायला मिळणार आहेत. 
  • रिक्त जागा : जाधववाडी (माढा) ग्रामपंचायत निवडणुकीत दोन ठिकाणी उमेदवार न मिळाल्याने या जागा रिक्त राहणार आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Madha taluka the Gram Panchayat elections will be played only among the groups of Shinde supporters