
सोलापूर : लॉकडाउनमुळे देशभरातील उद्योग-व्यवसायांना फटका बसला असून, अनेक उद्योग-व्यवसाय देशोधडीला लागले आहेत. सोलापुरातील गारमेंट उत्पादकांना किरकोळ कामांवर दिवस काढावे लागत आहेत. त्यातच देशातील गारमेंट उत्पादनातील अग्रगण्य मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेडचे सोलापूरचे गारमेंट युनिटही सुटले नाही. युनिफॉर्म निर्यातीतही अव्वल असलेल्या या युनिटवर परिणाम झाला असून, कामगारांच्या कामाच्या वेळा कमी करून फॅन्सी उत्पादनांकडे मफतलालने लक्ष वेधले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून लॉकडाउनमुळे सोलापुरातील गारमेंट उद्योग व्हेंटिलेटरवर गेला आहे. शाळा कधी सुरू होणार, याचा काही नेम नसल्याने युनिफॉर्म मेकर्स देशोधडीला लागायच्या मार्गावर आहेत. अनेकाजण फॅन्सी कपड्यांकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्या उत्पादनांची मार्केटिंग करणार कसे? नवीन ग्राहक आता मिळणार कुठून? त्यातही उधारी देणे परवडणार का, असे अनेक प्रश्न सध्या या उद्योजकांवर पडले आहेत. काही उत्पादकांनी चार-पाच रुपये प्रतिमास्क असे किरकोळ काम सुरू केले आहे. त्यातून कामगारांचा पगार व इतर खर्च भागवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
सोलापुरातील गारमेंट उत्पादकांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म प्रदर्शनामुळे येथील वाढत्या गारमेंट उद्योगाची दखल घेऊन मफतलाल कंपनीने 13 मे 2018 रोजी सोलापुरात गारमेंट युनिट सुरू केले. या युनिटमधून विविध युनिफॉर्मची उत्पादने घेतली जातात. येथील उत्पादने देशांतर्गत व कतार, दुबई या अरब देशांसह विविध देशांना निर्यात होतात. मात्र जगभरात कोरोनाने माजवलेल्या हाहाकाराने या वर्षी सर्व उत्पादनांना फटका बसला असून, युनिफॉर्मचे उत्पादन शून्यावर आले. शैक्षणिक वर्ष निम्मे संपत आले तरी शाळा कधी सुरू होणार, हे माहीत नाही व शाळा सुरू झाल्या तरी नवीन युनिफॉर्मची मागणी राहणार की नाही, याची शाश्वती नाही.
50 टक्के कामगारांवर फॅन्सी कपड्यांच्या सॅम्पलिंगचे सुरू आहे काम
युनिफॉर्म उत्पादने झाली नसल्याने आता मफतलाल युनिट फॅन्सी कपड्यांच्या सॅम्पलिंगच्या कामाला लागले आहे. व्हाईट शर्ट, कुर्ता-पायजमा, सनकोट, बाबला यासह दसरा-दिवाळी सणांचा विचार करून उत्पादने घेण्याची तयारी मफतलाल करत आहे. कामगारांना एक दिवसाआड कामावर बोलावले जात आहे व कामाच्या वेळाही कमी केल्या आहेत. त्यामुळे कामगारांच्या रोजगारावरही मोठा परिणाम झाला आहे.
याबाबत सोलापूरच्या मफतलाल गारमेंट विभागाचे प्रमुख गुरू शालगर म्हणाले, कोरोनामुळे या वर्षी शाळा कधी सुरू होणार माहीत नाही. शासकीय टेंडरसुद्धा निघाले नाहीत. युनिफॉर्मचे उत्पादन शून्यावर आले आहे. आता दसरा-दिवाळी नजरेसमोर ठेवून फॅन्सी कपड्यांच्या सॅम्पलिंगची कामे सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.