
सोलापूर : महाराष्ट्र भूषण पुरस्कारातून गेल्या सोळा वर्षात कृषी, पशुसंवर्धन, पाणी, ऊर्जा, पर्यावरण, शिक्षण, अर्थशास्त्र, राजकारण आदी पायाभूत क्षेत्रांना वगळण्यात आल्याची तक्रार प्रफुल्ल कदम यांनी शासनाकडे केली आहे.
लोकप्रियता, व्यावसायिक उंची आणि लपलेली जातीय-धार्मिक-पक्षीय भावना यापेक्षा त्याग व सेवा यांना प्राधान्य देण्याचा आग्रह त्यांनी शासनाकडे केला आहे.
महाराष्ट्र शासनाने सन 1996 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची योजना सुरू केलेली आहे. हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला प्रदान करण्यात येईल असा शासननिर्णय जाहीर केला आहे. तथापि गेल्या सोळा वर्षात केवळ संगीत, साहित्य, क्रीडा या क्षेत्रालाच अधिक प्राधान्य दिले असून कृषी, पशुसंवर्धन, पाणी, ऊर्जा, पर्यावरण, अर्थशास्त्र या पायाभूत क्षेत्रांना जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याची तक्रार किसान आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
प्रफुल्ल कदम यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात त्याग व सेवा यापेक्षा लोकप्रियता, व्यवसायिक उंची, लपलेली जातीय-धार्मिक-पक्षीय भावना आणि त्या त्या वेळचा राजकीय फायदा यासारख्या बाबी लक्षात घेऊन पुरस्कार देण्याची पद्धत रूढ झाली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबतही आतापर्यंतच्या 16 पैकी काही पुरस्कारांबाबत असा आक्षेप जाहीरपणे नोंदवण्यात आलेला आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने "महाराष्ट्र भूषण पुरस्कार' सारखा पुरस्कार निवडताना आता खबरदारी घेणे, अत्यंत गरजेचे आहे. कारण हा पुरस्कार राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
निमंत्रित सदस्यांबद्दल आक्षेप
महाराष्ट्र शासनाने नुकतीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अनिल काकोडकर, डॉ. प्रकाश आमटे, बाबा कल्याणी, संदीप पाटील, दिलीप प्रभावळकर ही मान्यवर व वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी त्यामध्ये अशासकीय सदस्य म्हणून निमंत्रित केली आहेत. यामध्ये एकही महिला नाही आणि वर नमूद केलेल्या पायाभूत क्षेत्राशी थेट संबंध असणारा एकही तज्ज्ञ व्यक्ती नाही, असा आक्षेपही त्यांनी घेतला आहे.
संपादन : अरविंद मोटे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.