एक वेळच्या जेवणासाठी कामगार आला काकुळतीला

श्रीनिवास दुध्याल 
Friday, 1 May 2020

विडी कामगार, यंत्रमाग कामगार, हॉटेल कामगार, पेंटर, गॅरेज कामगार, बांधकाम कामगार, घरकाम करणाऱ्या मोलकरीण अशा अनेक क्षेत्रातील कामगारांच्या हातचे रोजगार लॉकडाउनमुळे हिरावून गेले आहेत. नेहमीच दीन राहणारा मात्र कोणासमोर हात न पसरता कष्टाने जगणारा कामगार या वर्षी मात्र लोकप्रतिनिधी व सेवाभावी संस्थांकडे मदतीची याचना करताना दिसत आहे.

सोलापूर : असंघटित क्षेत्रातील निम्म्याहून अधिक कामगारांना ज्ञात नसलेला कामगार दिन (1 मे) कोरोना विषाणूच्या दहशतीखाली होत आहे. दरवर्षी कामगार दिनाच्या सुटीमध्येसुद्धा पोट भरण्यासाठी काबाडकष्ट करणारा कामगार या वर्षी मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये एकवेळच्या जेवणासाठी काकुळतीला आला आहे. 
विडी कामगार, यंत्रमाग कामगार, हॉटेल कामगार, पेंटर, गॅरेज कामगार, बांधकाम कामगार, घरकाम करणाऱ्या मोलकरीण अशा अनेक क्षेत्रातील कामगारांच्या हातचे रोजगार लॉकडाउनमुळे हिरावून गेले आहेत. नेहमीच दीन राहणारा मात्र कोणासमोर हात न पसरता कष्टाने जगणारा कामगार या वर्षी मात्र लोकप्रतिनिधी व सेवाभावी संस्थांकडे मदतीची याचना करताना दिसत आहे. बैल पोळ्याला बैलांना गोडधोड खाऊ घालून, त्यांना सजवून, एक दिवस विश्रांती देऊन जसे शेतकरी बैलांचे ऋण व्यक्त करतात, तसे कामगारांचे ऋण व्यक्त करण्याचे औदार्य मालकांसह शासन व प्रशासनाने यंदाच्या लॉकडाउनच्या कालावधीत दाखवावे, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केल्या. 
लॉकडाउनमुळे सोलापुरातील यंत्रमाग उद्योग, विडी उद्योग, गारमेंट, बांधकाम, तसेच अनेक असंघटित क्षेत्रातील कामगारांवर सध्या बेरोजगारीचे संकट कोसळले असून, लॉकडाउन कधी उठेल व कष्टाची भाकर कधी मिळेल, याची वाट कामगार पाहात आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालकांना आवाहन केले होते, माणुसकीच्या दृष्टिकोनातून कुठल्याही कामगाराचा पगार कापून घेऊ नये. तसेच लॉकडाउनच्या कालावधीत पूर्ण पगार मिळावा, यासाठी कामगार मागणीही करत आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांचा अद्यापपर्यंत तरी कोणी दखल घेतल्याचे दिसून येत नाही. लॉकडाउनच्या कालावधीत गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे सण साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. अनेक गरिबाघरचे विवाह समारंभही रद्द झाले आहेत. लॉकडाउननंतरही अनेकांसमोर आर्थिक आरिष्ट उभे राहणार आहे. अशा परिस्थितीत निदान मालक, कामगार संघटना व शासकीय अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून कामगारांना जगवण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करावा, अशी रास्त अपेक्षा कामगारांची आहे. 

आमच्या नशिबी का आला हा लॉकडाउन? 
आधीच महागाई आकाशाला भिडलेली, महिनाभर काम करूनही मजुरीसाठी वाट पाहावी लागते. मजुरीच्या दुप्पट खर्च, यात काय बचत होणार? मुलांचे शिक्षण, संगोपन कसं करणार? या काळजीने जगावं की मरावं या मानसिकतेत जीवन जगताना अचानक आमच्या नशिबी लॉकडाउन आला आणि काय करावं काहीच सुचेना. किमान एक वेळच्या जेवणासाठी तगमग सुरू आहे. रेशन दुकानातून फक्त तांदूळ आणि गहू मिळाला पण भाजीपाला ते मिठापासून अनेक गोष्टी लागतात. कामगारांच्या व्यथा जाणून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी विडी कामगार 
- लक्ष्मी गोर्रे यांनी केली

तर जनतेचा प्रक्षोभ वाढले
2020 चा कामगार दिन अत्यंत काळजी वाढवणारा आणि भविष्याविषयी भीती निर्माण करणारा आहे. लॉकडाउनने कामगार आणि सर्वसामान्य जनतेला गारद केले. त्यांना बंद काळातील मजुरी, रोख अनुदान, अन्नधान्य, आरोग्य सुविधा, कोरोनापासून संरक्षण याबाबत सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सरकार योग्य भूमिका न घेतल्यास जनतेचा प्रक्षोभ वाढेल आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याचे सरकारलाच भोगावे लागतील.
- ऍड. एम. एच. शेख,
राज्य महासचिव, सिटू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Day in the wake of lockdown