सभापतींसाठी खुशखबर ; स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुका स्थगित 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 7 एप्रिल 2020

स्थायी समितीसाठी इच्छुकांचा हिरमोड 
सोलापूर महापालिका स्थायी समितीचा सदस्य आणि सभापती होण्यासाठी मोठी रस्सीखेच असते. सध्या समिती सभापती निवडीचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आता निर्णय आला तरी शासनाच्या निर्णयामुळे निवडणुका घेता येणार नाहीत. स्थायी समितीत 16 तर सात विशेष समितीमध्ये प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. समितीमधील सदस्य निवडी आता पक्षीय बलानुसार होतात. मात्र त्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. सोलापूर महापालिकेत 102 लोकनियुक्त, तर पाच स्वीकृत सदस्य आहेत. याशिवाय अधिकाऱ्यांची संख्या एकत्रित केली तर ही संख्या दोनशेच्या वर जाते. त्यामुळे सभा बोलावली तरी ती घेता येणार नाही हे जवळपास निश्‍चित आहे. 

सोलापूर : राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतीमधील स्थायी समिती व इतर विषय समित्यांच्या निवडणुका बेमुदत कालावधीसाठी स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, त्या संदर्भातील आदेश राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यमान सभापतींना मुदतवाढ मिळाली असून, समितीत जाण्यासाठी इच्छुकांचा मात्र हिरमोड होणार आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने साथीचा रोग म्हणून घोषित केलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यातही सुरु झाला आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. आरोग्य व वैद्यकीय विभागाचे संचालक, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना या अधिनियमांच्या अंमलबजावणीसाठी सक्षम अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच राज्यात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. 

महापालिका व नगरपालिकांच्या अधिनियमातील तरतुदीनुसार स्थायी समिती व इतर विशेष समित्यांच्या सदस्यांची मुदत संपल्यावर त्या ठिकाणी नवीन सदस्यांची निवड करणे बंधनकारक आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेत नगरसचिव महापौरांशी चर्चा करून, तर इतर महापालिकांमध्ये विभागीय आयुक्तांमार्फत तर नगरपरिषद व नगरपंचायतीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र सद्यस्थितीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव होण्याची शक्‍यता असल्याने या निवडणुका स्थगित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे समितीत जाऊ इच्छिणाऱ्यांचा हिरमोड झाला असून, विद्यमान सभापतींना मात्र मुदतवाढ मिळणार आहे. 

शासनाचे आदेश प्राप्त
महापालिकेतील सर्व प्रकारच्या निवडणुका स्थगिती ठेवण्याबाबत शासनाचे अवर सचिव विवेक कुंभार यांचे आदेश मिळाले आहेत. त्यामुळे सर्व निवडणुका स्थगित करण्यात येणार आहेत. या आदेशाच्या प्रती पदाधिकारी व नगरसेवकांना पाठविण्यात येणार आहेत. 
- रऊफ बागवान, नगरसचिव 
सोलापूर महापालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra state government give a stay to all comitees elections in local self government