esakal | महेश कोठे, तौफिक शेख यांनी पुन्हा घेतली राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट 
sakal

बोलून बातमी शोधा

logo

आगोदर आमदार बबनदादा शिंदे आता जिल्हाध्यक्ष बळिराम साठे 
महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी 2012 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यावेळी त्यांनी बारामतीला जाण्यासाठी माढा तालुक्‍यातील निमगावचा मार्ग स्विकारला होता. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्फत त्यांनी प्रयत्न केले होते परंतु ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. आता 2020 मध्ये पुन्हा बारामतीला जाण्यासाठी महेश कोठे यांनी वडाळ्याचा मार्ग स्विकारला आहे. जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या माध्यमातून ते राष्ट्रवादीत जाण्यासाठी प्रयत्न करु लागले आहेत. 

महेश कोठे, तौफिक शेख यांनी पुन्हा घेतली राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे हे त्यांच्या प्रवेशाबद्दल आफवा पसरविल्या जात असल्याचे वारंवार सांगत आहेत. एकीकडे हे सांगत असताना दुसरीकडे त्यांनी व त्यांचे पुत्र नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी शुक्रवारी (ता. 9) रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख हे देखील उपस्थित होते. 

मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने हे शुक्रवारी सात रस्ता येथील शासकिय विश्रामगृह येथे उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे शासकिय विश्रामगृहात दाखल झाले. काही तासानंतर त्या ठिकाणी महेश कोठे व त्यांचे पुत्र प्रथमेश कोठे हे देखील हजर झाले. कामानिमित्त विजापूरला गेलेल्या एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांनाही शुक्रवारी रात्री सात रस्ता येथील शासकिय विश्रामगृहात बोलवून घेण्यात आले. आमदार माने, जिल्हाध्यक्ष साठे, नगरसेवक महेश कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे आणि नगरसेवक तौफिक शेख यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महेश कोठे आणि तौफिक शेख यांनी घेतलेल्या भेटीबाबतही काल रात्री सविस्तर चर्चा झाली. 

या गुप्त भेटीबाबत सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना कसलीही कल्पना देण्यात आलेली नव्हती हे विशेष. सोलापूरच्या ग्रामीण भागात भक्कम असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रसने आता सोलापूर शहरात नव्या नेत्यांचा शोध सुरु केला आहे. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी जनाधार असलेल्या सोलापुरातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांना कसे यश येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.