महेश कोठेंना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वेळ घेऊन मुंबईला भेटायला ये 

प्रमोद बोडके
Wednesday, 21 October 2020

अजितदादांनी दिले होते संकेत 
सोलापूरच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजितदा पवार आल्यानंतर सोलापूर शहरातील महापालिकेचे विरोधी पक्ष नेते महेश कोठे व एमआयएमचे नगरसेवक तोफिक शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले होते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या तिघांचे राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे. आम्ही तिघांनीही एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असा संकेत आमच्यात ठरल्याचे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशास तूर्तास पूर्णविराम दिला होता. 

सोलापूर : सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्ष नेते महेश कोठे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. महेश कोठे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतल्याने या चर्चांना सुरुवात झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आज तुळजापूरच्या दौऱ्यावर आहेत. तुळजापुरला जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विमानाने सोलापूर विमानतळावर आले. सोलापूर विमानतळावर महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आवर्जून भेट घेतली. 

मला तुझ्याशी खूप काही बोलायचं, तू वेळ घेऊन मुंबईला भेटायला ये अशी सूचना मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी दिली. सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. अशा स्थितीत सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांना ना महापालिकेचा निधी मिळतो, ना राज्य सरकारचा निधी मिळतो. सोलापुरातील शिवसेना नगरसेवकांना राज्य सरकारकडून दहा कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

अतिवृष्टी, महापूर आणि कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून मार्चनंतर सोलापुरातील शिवसेना नगरसेवकांसाठी आणखी 25 कोटी रुपयांची मागणी करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी दिली. सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा व्हावा यासाठी टाकळी ते जुळे सोलापूर दरम्यान 125 कोटी रुपयांची 110 एमएलडीची पाणीपुरवठा योजना मंजूर करावी अशी मागणीही विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To Mahesh Kothe, Chief Minister Thackeray said, take time to visit Mumbai