कोठेंचा "राष्ट्रवादी'त प्रवेश, पण सदस्यत्व नाहीच ! ताकदवान कोठे अस्वस्थ का? उद्धव ठाकरे म्हणाले, कारणे शोधा 

तात्या लांडगे 
Sunday, 10 January 2021

ठळक बाबी... 

  • शुक्रवारी (ता. 8) महेश कोठे यांनी केला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश 
  • महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण होऊ नये म्हणून थांबली अधिकृत घोषणा 
  • शिवसेनेने केली कोठे यांची हकालपट्टी; जुन्या पदाधिकाऱ्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना धरले जबाबदार 
  • कोठे यांना तत्काळ प्रवेश देण्याची जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मागणी; कोठे यांना भाजपचाही संपर्क 

सोलापूर : सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकावला जावा, या उद्दिष्टपूर्तीसाठी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांना राष्ट्रवादीत आणले. तर आगामी विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची संधी देण्याचे मान्य केल्याची चर्चा आहे. शुक्रवारी (ता. 8) कोठे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला; मात्र शिवसेना नाराज होईल म्हणून राष्ट्रवादीने त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिलेले नाही. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय होणार आहे. तत्पूर्वी, कोठे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिला असून, आता फक्त अधिकृत घोषणा राहिली आहे, असे स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच सांगितले, की कोठे हे अनेक दिवसांपासून अस्वस्थ असून, ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. परंतु, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याने एकमेकांच्या पक्षातील अस्वस्थ नेते कोणी कोणाच्या पक्षात घ्यायचे नाही, असा प्रोटोकॉल ठरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोठे यांची गोची झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, कोठे यांची सोलापूर शहरात मोठी ताकद असल्याने त्यांना सर्वच पक्षांत संधी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस ही संधी गमावणार नाही. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रवेश दिला आहे; परंतु अधिकृत घोषणा लवकरच होईल, असेही बळिराम साठे म्हणाले. कोठे यांच्यासारखा ताकदवान नेता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येणार असल्याने शहरातील ताकद वाढेल. शहर उत्तर या मतदारसंघातही राष्ट्रवादी मजबूत होणार आहे, असेही बळिराम साठे म्हणाले. कोठे यांना पक्षात घेण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

महेश कोठे यांची ताकद किती? 
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने महेश कोठे यांनी बंडखोरी केली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षाचे सचिव नार्वेकर यांनी त्यांची हकालपट्टी केल्याचे पत्र जाहीर केले. मात्र, महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडेच ठेवण्यात आले. मात्र, आमदारकीचे स्वप्न बाळगणाऱ्या कोठे यांची अस्वस्थता कायम होती. याची जाणीव असतानाही पक्षातील कोणताच पदाधिकारी काहीच करू शकला नाही. अखेर कोठे यांनी विरोधी पक्षनेतेपद अमोल शिंदे यांच्याकडे सोपवून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. त्यांचा अनौपचारिक प्रवेश झाला, मात्र त्यांच्यासोबत किती नगरसेवक शिवसेना पक्ष सोडतील, याची उत्सुकता लागली आहे. तूर्तास, कोठे यांच्याशिवाय कोणीच शिवसेना सोडणार नाही, अशीही चर्चा आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी मात्र मोठी खांदेपालट होणार असल्याचीही चर्चा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh Kothe joined the NCP but did not get membership