महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला खिंडार ! मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत कोठे करणार राष्ट्रवादीत प्रवेश 

तात्या लांडगे 
Thursday, 7 January 2021

राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची सत्ता आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर मध्य हा विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळणार नाही, आगामी चार वर्षांत शहर उत्तर या मतदारसंघात विकासकामे करून 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपले स्थान बळकट करण्यासाठी महेश कोठे हे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा आहे. 

सोलापूर : विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी विसरून शिवसेनेने महेश कोठे यांना महापालिका विरोधी पक्षनेते म्हणून कायम ठेवले. चार वर्षांनंतर आता विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचेच समर्थक अमोल शिंदे यांची निवड झाली आहे. मात्र, कोठे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली आहे. शुक्रवारी (ता. 8) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळिराम साठे यांच्यासोबत कोठे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहेत. त्या वेळी त्या ठिकाणीच त्यांचा प्रवेश होईल, असा दावा साठे यांनी "सकाळ'शी बोलताना केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोठे यांनी त्यांच्या समर्थक नगरसेवकांसह कार्यकर्त्यांची रविवारी (ता. 6) बैठक घेतली. दरम्यान, अमोल शिंदे यांची विभागीय आयुक्‍तांकडून गटनेता तथा विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक महापौरांना पत्र देऊन त्यांची अधिकृत घोषणा करतील, असा नियोजित कार्यक्रम होता. मात्र, पुण्यातून येतानाच अमोल शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि नियोजित कार्यक्रम फिस्कटल्याचे पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

तत्पूर्वी, 2019 मधील विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने कोठे यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तत्पूर्वी, कोठे यांनी पक्षातील काही नगरसेवकांना सोबत घेऊन विभागीय आयुक्‍तांकडे गट स्थापनेस परवानगी मागितली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विभागीय आयुक्‍तांकडील कोठे यांचा अर्ज तसाच राहिला. तो विषय आता विभागीय आयुक्‍तांकडून मार्गी लागल्याने कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेशातील अडसर दूर झाला आहे. 

राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची सत्ता आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर मध्य हा विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळणार नाही, आगामी चार वर्षांत शहर उत्तर या मतदारसंघात विकासकामे करून 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपले स्थान बळकट करण्यासाठी कोठे हे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशीही चर्चा आहे. दुसरीकडे महापालिकेत 10 नगरसेवकांची ताकद सोबत घेऊन सभागृहात विकासकामांवर आवाज उठवणारी तौफिक शेख यांची "एमआयएम'देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार हे नक्की झाले आहे. मात्र, एमआयएमकडील 10 पैकी 4 नगरसेवक तौफिक शेख यांच्या विरोधात असल्याने त्यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडला आहे. काही दिवसांत तौफिक शेख हे उडवत असलेले पतंग म्यान करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हाती घालणार आहेत. त्यासाठी आमदार संजय शिंदे यांनी मोठे परिश्रम घेतले आहे. 

महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला खिंडार? 
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेवारी न मिळाल्याने महेश कोठे यांनी काही नगरसेवकांना सोबत घेऊन "मातोश्री' गाठली. त्यातील काही नगरसेवक कोठे यांच्या कुटुंबातील असून काही नगरसेवक त्यांचे कट्टर समर्थक आहेत. पहिल्यांदा कोठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत कोणाचाही प्रवेश ठरलेला नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी मातोश्रीवर जाताना कोठे यांच्यासोबत असलेले नगरसेवक सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा आता सुरू आहे. कोठे यांच्यासोबत दहा- बारा नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यास शिवसेनेला मोठे खिंडार पडणार असून, महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला तारेवरील कसरत करावी लागेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh Kothe will join the NCP in the presence of Sharad Pawar in Mumbai