महूदच्या डॉ. भोसले यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा ! जगातील दोन टक्के प्रशंसनीय संशोधकांच्या यादीत समावेश 

उमेश महाजन 
Wednesday, 4 November 2020

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने सर्वेक्षण करून जगातील सर्वोच्च प्रशंसनीय संशोधकांची यादी बनवली आहे. या यादीत महूद (ता. सांगोला) येथील डॉ. चंद्रकांत हरी भोसले यांचा समावेश करण्यात आला आहे. 

महूद (सोलापूर) : अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने सर्वेक्षण करून जगातील सर्वोच्च प्रशंसनीय संशोधकांची यादी बनवली आहे. या यादीत महूद (ता. सांगोला) येथील डॉ. चंद्रकांत हरी भोसले यांचा समावेश करण्यात आला आहे. 

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने सर्वेक्षण करून जगातील दोन टक्के सर्वोच्च प्रशंसनीय संशोधकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. जगातील या दोन टक्के संशोधकांमध्ये Materials Scientist म्हणून येथील डॉ. चंद्रकांत हरी भोसले यांचा समावेश करण्यात आला आहे. अत्यंत प्रतिकूल परस्थितीत व सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या डॉ. चंद्रकांत भोसले यांचा जीवन प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. घरची गरिबी असल्याने शिवाजी विद्यापीठाच्या कमवा व शिका या योजनेतून काम करत त्यांनी एमएस्सी ही पदवी घेतली. पुढे रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून काम करीत असताना त्यांनी संशोधनही चालू ठेवले. 1988 मध्ये त्यांनी पीएच.डी. मिळवल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून काम केले. 

शिवाजी विद्यापीठात पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. डॉ. चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 27 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ही पदवी मिळवली आहे. डॉ. भोसले यांचे 217 संशोधन लेख नामांकित मासिकांमधून प्रकाशित झाले आहेत. "पाणी शुद्धिकरण' हा त्यांच्या संशोधनाचा विषय असून, या विषयावर भारतासह परदेशात त्यांनी शंभरहून अधिक व्याख्याने दिली आहेत. 

पाणी शुद्धिकरण या विषयाचा अभ्यास करण्यासाठी जागतिक स्तरावर अमेरिका, चीन, झेक रिपब्लिक आदी देशांत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले आहे. 2016 मध्ये शिवाजी विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते अतिग्रे (कोल्हापूर) येथील संजय घोडावत विद्यापीठात पदार्थविज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने बनवलेल्या दोन टक्के संशोधकांच्या यादीत डॉ. चंद्रकांत भोसले यांचा समावेश झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 

प्रतिकूल परिस्थितीशी लढताना कधीही हार मानू नये. व्यक्तीच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे मत डॉ. चंद्रकांत भोसले यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahud's Dr. Bhosale included in the list of international researchers