esakal | सोलापूर शहरातील प्रमुख नाले तुंबले (VIDEO)
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर शहरातील प्रमुख नाले तुंबले (VIDEO)

झोपडपट्टीवासीयांना त्रास 
शहरातल्या बहुतांश झोपडपट्ट्या नाल्यांच्या शेजारी असलेल्या जागेपासूनच विस्तीर्ण झाल्या आहेत. शास्त्रीनगर, दत्तनगर, दाजी पेठेतल्या झोपडपट्ट्यांमधून नाला वाहतो. त्याच्या लगतच घरे आहेत. काही घरांमध्ये जाणारा मार्ग हा नाल्यावरूनच आहे. अशा परिसरातील नाल्यांची नेहमीच सफाई होणे अपेक्षित आहे.

सोलापूर शहरातील प्रमुख नाले तुंबले (VIDEO)

sakal_logo
By
विजयकुमार सोनवणे

सोलापूर : पावसाळ्याचे वेध लागले, की शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरवात होते. वास्तविक वेळोवेळी स्वच्छ करावेत, अशी या नाल्यांची स्थिती असते. मात्र, पावसाळ्यापूर्वीच सफाईचे काम होते. एखादा मोठा पाऊस झाला, की नाल्याची सफाई किती गांभीर्याने केली जाते, याचे उत्तरच मिळते. त्यामुळे अशी सफाई "फ्लॉप शो' ठरते, हा आजवरचा अनुभव आहे. या पार्श्‍वभूमीवर नियोजन आणि गांभीर्यपूर्वक नालेसफाई झाल्यास पावसाळ्यात प्रशासनाला करावी लागणारी धावपळ थांबेल, शिवाय नागरिकांनाही त्रास होणार नाही. 


कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येने नालेसफाईचे काम खासगी मक्‍तेदारामार्फत करावे लागते. यावर लाखो रुपये खर्च होतात. तत्कालीन आयुक्त एम. एस. देवणीकर यांनी महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांकडून हे काम करून घेतले होते. त्यामुळे तब्बल 30 लाख रुपयांची बचत झाली होती. हाच पॅटर्न आताही लागू करता येऊ शकतो. मात्र, त्यासाठी पुरेशी कर्मचारी संख्या असणे आवश्‍यक आहे. सध्या 125 ते 150 कर्मचारी आवश्‍यक आहेत. प्रत्यक्षात 25 ते 30च कर्मचारी उपलब्ध होतात. त्यामुळे नालेसफाईचे काम संथगतीने सुरू आहे. 

नाल्यावरील बांधकामे 
गणेशपेठ, पंखा विहीर, कुंभार वेस, निराळे वस्ती परिसरातील नाल्यांवर मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. नाल्यावर बांधकामे करता येतात की नाहीत, याबाबत मतभेद आहेत. मात्र, या बांधकामांमुळे नाले तुंबण्याचे प्रमाण मोठे आहे. नाले वेळीच स्वच्छ न केल्याने कुंभार वेस परिसरातील दुकानांत पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काही वर्षांपूर्वी झाली होती. काही भागातील झोपडपट्टीत पाणी शिरले होते. पंखा विहिरीवरील बांधकामामुळे आजूबाजूच्या अपार्टमेंटमध्ये पाणी शिरल्याच्याही घटना झाल्या आहेत. 

नाल्यात काय आढळते 
प्लास्टिक, झाडांची पाने, फांद्या आदी नाल्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण करतात. हे केवळ पावसाळ्यापूर्वीच नव्हे तर सातत्याने काढण्याची गरज आहे. एखादा मोठा पाऊस झाला की पुन्हा गाळ, दगड, कचरा, टाकाऊ कपडे, झाडाच्या फांद्या, काचा, लोखंडाचे तुकडे, प्लास्टिकच्या बाटल्या, कापड, नारळाच्या करवंट्यांनी नाले भरून जातात. पोर्टर चाळीजवळ नालेसफाई करताना तलवारी आणि वायरचे बंडल आढळले. या दोन्ही वस्तू रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात देण्यात आल्या. नाल्यातून काढलेला कचरा हा नाल्याच्या कडेलाच ठेवला जातो. तो वेळेवर उचलला जात नाही. पाऊस पडला, की हा सर्व कचरा पुन्हा नाल्यात पडतो व पुन्हा अडथळा निर्माण होतो. 

झोपडपट्टीवासीयांना त्रास 
शहरातल्या बहुतांश झोपडपट्ट्या नाल्यांच्या शेजारी असलेल्या जागेपासूनच विस्तीर्ण झाल्या आहेत. शास्त्रीनगर, दत्तनगर, दाजी पेठेतल्या झोपडपट्ट्यांमधून नाला वाहतो. त्याच्या लगतच घरे आहेत. काही घरांमध्ये जाणारा मार्ग हा नाल्यावरूनच आहे. अशा परिसरातील नाल्यांची नेहमीच सफाई होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नसल्याने झोपडपट्टीवासीयांना नेहमीच अनारोग्याचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर त्यांचे जगणे कठीण होते. महापालिकेच्या सफाई यंत्रणेने किमान या परिसरात तरी नियमित नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी सातत्याने होते. 

सोलापूर शहरातील प्रमुख नाले तुंबले (VIDEO)