टेंभुर्णी नगरपंचायतसाठी प्रस्ताव द्या, नगर विकास विभागाचे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 

प्रमोद बोडके
Friday, 18 December 2020

करकंबच्या प्रस्तावाची उत्सुकता 
सोलापूर जिल्ह्यातील ज्या ज्या मोठ्या ग्रामपंचायतीने नगरपरिषद अथवा नगरपंचायत होण्यासाठी प्रस्ताव दिले, पाठपुरावा केला त्यांचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. पंढरपूर तालुक्‍यातील करकंब ग्रामपंचायतीनेही असाच प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर मात्र अद्यापही काहीच कार्यवाही झाली नसल्याने करकंब ग्रामपंचायतीचे काय होणार? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, नातेपुते, वैराग, महाळुंग-श्रीपुर या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद व नगरपंचायत होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. ही प्रक्रिया तीन महिन्यासाठी स्थगित करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे. माढा तालुक्‍यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करण्यासाठी आवश्‍यक असलेला प्रस्ताव अभिप्रायासह देण्याची विनंती महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने आज सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. याबाबतचे पत्र आज जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले आहे. 

माढा तालुक्‍यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतमध्ये करण्यासाठी आवश्‍यक असलेला प्रस्ताव सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे. हा प्रस्ताव सादर करताना 1965 च्या अधिनियमातील तरतुदीनुसार गावाची लोकसंख्या (2011 च्या जनगणनेनुसार) सादर करावी लागणार आहे. टेंभुर्णीतील अकृषिक रोजगाराची टक्केवारी, क्षेत्रफळ, सर्व्हे क्रमांक, नकाशा यासह प्रस्ताव सादर करण्याची विनंती नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी वि. ना. धाईंजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. दरम्यान माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी 10 डिसेंबर 2019 रोजी याबाबतची मागणी नगर विकास विभागाकडे केली होती. माढ्यातून शिवसेनेकडून 2019 ची विधानसभा निवडणूक लढलेले संजय कोकाटे यांनी 24 फेब्रुवारी 2020 रोजी याबाबतची मागणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत करण्यासाठी त्यांनी पत्र दिले होते. 

सोलापूर- पुणे महामार्गावरील महत्वाचे गाव म्हणून टेंभुर्णीची ओळख आहे. एमआयडीसी व अनेक मोठे उद्योग टेंभुर्णी परिसरात सुरू झाले आहेत. त्यामुळे शेजारील पन्नास गावातील लोक टेंभुर्णी शहरात राहण्यासाठी आले आहेत. टेंभुर्णीची सध्याची लोकसंख्या 40 हजाराच्यांवर आहे. त्या ठिकाणी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायतीला मर्यादा येतात म्हणून टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत करावे अशी मागणी कोकाटे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make a proposal for Tembhurni Nagar Panchayat, a letter from the Urban Development Department to the District Collector of Solapur